प्रतिनिधी / इचलकरंजी
येथील मोक्कांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या फरारी आरोपीला पुणे येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. मिंटू उपेंद्र रॉय वय ३४, रा. शहापूर, इचलकरंजी, मूळ रा. जहांगीरपूर शाम, बिहार असे त्याचे नाव आहे. शहापूर येथील पोलिस ठाण्यामध्ये याच्याविरोधात दोन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल झाला आहे.
शहापूर भागातील तुळजाभवानी अपार्टमेंटमध्ये फिर्यादी यांची नातवंडे दंगा करत असल्याचा कारणातून एका घरात घुसून महिलेकडून सोन्याचे दागिने काढून घेत आम्ही अमोल माळी गँगमधील आहोत, आमच्याकडे बंदूक आहे. असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली होती. या टोळीविरोधात १८ नोव्हेंबर २०१८ रोजी मंगल शिवानंद हाजिंगे यांनी शहापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या टोळीवर मोक्कांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून रॉय हा फरारी होता.
संशयित रॉय हा पुणे येथे एका कारखान्यात असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांना मिळाली. त्यानुसार त्याच्या शोधासाठी ४ पथक तैनात करण्यात आले होते. दरम्यान, पुणे येथील एका कारखान्यामध्ये रॉय हा पथकाला आढळून आल्याने त्याला ताब्यात घेतले. ही कामगिरी वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल इकबाल महात, असिफ कलायगार, सचिन देसाई, प्रदीप नाकील यांच्या पथकाने केली