राम मंदिर उभारणीस लवकरच प्रारंभ : पंतप्रधानांचा दौरा होणार
वृत्तसंस्था/ अयोध्या
भगवान श्रीरामाचे मंदिर उभारण्यास प्रारंभ करण्यापूर्वी जन्मभूमी परिसरात कुबेर टीला येथे बुधवारी 28 वर्षांनी कुबेरेश्वर शिवलिंगाचा रुद्राभिषेक करण्यात आला आहे. मणिराम छावणीचे महंत कमल नयनदास यांनी दोन तास चाललेल्या या धार्मिक विधीत भाग घेतला आहे.
कुबेर टीला रामजन्मभूमी परिसरात असून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या देखरेखीत हे क्षेत्र येते. मंदिर उभारणीतील सर्व अडथळे दूर करणे आणि कोरोना महामारीच्या खात्म्यासाठी रुद्राभिषेक करण्यात आल्याचे उद्गार महंत कमल नयन यांनी काढले आहेत.
राम मंदिराच्या उभारणीची तयारी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट करत आहे. भूमीच्या सपाटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मंदिर उभारणीचे काम लवकर सुरू व्हावे याकरता संतसमाज उत्सुक आहे. मंदिर उभारणीस प्रारंभ होण्यापूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते गर्भगृह स्थळाचे भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना यापूर्वीच आमंत्रित करण्यात आले होते, परंतु कोरोना संकटामुळे हा सोहळा होऊ शकला नाही. पंतप्रधान मोदींची भेट घेऊन त्यांना सोहळय़ासाठी निमंत्रित करणार असल्याचे महंत म्हणाले.
रामलल्लाचे दर्शन करण्यासाठी गेलो असता कुबेर टीला येथील शिवलिंगाचे मंदिर दिसून आले. मंदिरात रुद्राभिषेक करण्याची इच्छा आज पूर्ण केली आहे. राममंदिर उभारणीची प्रक्रिया दीर्घकाळापासून सुरू असून ट्रस्टने तयारी केली आहे. परंतु कोरोना संकटामुळे मंदिर उभारणीस विलंब होत आहे. अयोध्येचा दौरा करण्याची पंतप्रधानांची इच्छा होती, परंतु गर्दी होऊ नये याकरता त्यांचा कार्यक्रम सुनिश्चित होत नसल्याचे महंत कमल नयन यांनी सांगितले.