लखनौ / वृत्तसंस्था :
अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी होणाऱया भूमिपूजन सोहळय़ाची तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच मंदिरातील मुख्य पुजाऱयासह कार्यक्रमस्थळी तैनात करण्यात आलेल्या 16 पोलीस कर्मचाऱयांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले आहे. भूमिपूजनाचा सोहळा अवघ्या पाच-सहा दिवसांवर येऊन ठेपला असतानाच कोरोना संसर्गाचे वृत्त धडकल्यामुळे प्रशासन यंत्रणाही हादरली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन 5 ऑगस्ट रोजी केले जाणार आहे. दिवसभरात निमंत्रितांसह अनेक मान्यवर भूमिपूजन सोहळय़ाला उपस्थित राहणार आहेत. मात्र, कोरोना विषाणूचा संसर्ग अयोध्येपर्यंत पोहोचल्यामुळे आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. रामजन्मभूमीच्या जागेची पूजा करणारे पुजारी प्रदीप दास यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रदीप दास हे रामजन्मभूमीच्या प्रमुख चार पुजाऱयांपैकी एक आहेत. त्यांना सध्या क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, अयोध्येमध्ये सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या 16 पोलीस कर्मचाऱयांनाही कोरोना झाल्यामुळे चिंतेत आणखीनच भर पडली आहे.
उत्तर प्रदेश सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार बुधवारी अयोध्येमध्ये करोनाचे 66 नवे रुग्ण आढळून आले होते. आतापर्यंत अयोध्येत 605 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 375 करोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अयोध्या जिल्हय़ात आतापर्यंत कोरोनामुळे 13 जणांचा मृत्यू झाला आहे.