वृत्तसंस्था/ अयोध्या
अयोध्येच्या धन्नीपूरमध्ये उभारल्या जाणाऱया मशिदीचे (आराखडा) डिझाइन सादर करण्यात आले आहे. इंडो-इस्लामिक कल्चरल फौंडेशनने आभासी बैठकीत यासंबंधी माहिती दिली आहे. या मशिदीला कुठल्याच बादशहाचे नाव देण्यात येणार नाही. मशीद परिसरात संग्रहालय, वाचनालय आणि एक सामूहिक स्वयंपाकघरही निर्माण करण्यात येणार आहे. तसेच 200 ते 300 खाटांचे एक रुग्णालयही उभारण्यात येणार असल्याचे संबंधित संस्थेकडून सांगण्यात आले आहे.
नकाशाला मंजुरी मिळाल्यास 26 जानेवारीपासून मशिदीच्या उभारणीस प्रारंभ होणार आहे. याविषयीच्या प्रक्रियेला विलंब लागल्यास 15 ऑगस्ट रोजी हे काम सुरू होईल. प्रकल्पाच्या पूर्ततेस दोन वर्षे लागू शकतात. या प्रकल्पासाठी निधीची कुठलीच मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.
भव्य रुग्णालयाचा प्रस्ताव
संबंधित परिसरात सर्वप्रथम मृदा परीक्षण करविण्यात येणार असून त्यानंतर मशिदीचा नकाशा संमत करविण्यात येणार आहे. या प्रक्रियेनंतरच प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. मशीद, रुग्णालय, संग्रहालय सर्वांचे काम एकाचवेळी सुरू होईल. तेथे उभारण्यात येणाऱया रुग्णालयावर सुमारे 100 कोटी रुपयांचा खर्च येऊ शकतो.
बादशहाचे नाव नसणार
मशिदीला कुठल्याच बादशहाचे नाव दिले जाणार नसल्याची माहिती फौंडेशनचे प्रवक्ते अतहर हुसैन यांनी दिली आहे. ट्रस्टनुसार रुग्णालय 4 मजली राहणार असून ते धर्मादाय स्वरुपात संचालित होणार आहे. कार्याच्या शुभारंभावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना न बोलाविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. नव्या सुविधांना प्रारंभ झाल्याव राज्याचे मुख्यमंत्री आणि सर्वसामान्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. अयोध्येतील राम मंदिर उभारणीचे काम आता गतिमान झाले असून पुढील काही वर्षात ते भाविकांसाठी खुले होईल.
दोन मजली मशीद
मशीद 3500 चौरस मीटरमध्ये उभारण्यात येणार असून तेथे 2 हजार लोक एकत्रितपणे प्रार्थना करू शकणार आहेत. दुमजली मशिदीत महिलांसाठी विशेष जागा असणार आहे. इमारत पर्यावरणस्नेही असेल आणि त्यात सौरऊर्जेचा वापर होईल. तर रुग्णालय 24 हजार 150 चौरस मीटरमध्ये उभारण्यात येणार आहे.