मास्टरप्लानचे सादरीकरण : 20 हजार कोटींची विकासकामे राबवणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हर्च्युअल बैठकीच्या माध्यमातून अयोध्येतील राममंदिर विकासकामांचा आढावा घेतला. उत्तर प्रदेशात पुढच्या वषी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी अयोध्येत विकास करण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी अयोध्या विकास प्राधिकरणाने मास्टरप्लान तयार केला आहे. या मास्टरप्लानचे सादरीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर करण्यात आले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीसाठी संबंधित अधिकारीही उपस्थित होते. विकासासाठी पंतप्रधानांनी मोलाचे मार्गदर्शन केले. पुढील वर्षी राज्यात होणाऱया विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अयोध्येचा मास्टरप्लान वेळेआधी पूर्ण करण्यासही त्यांनी सांगितले. त्यासोबत विकासाचे मॉडेल तयार करण्यासाठी 6 महिन्यांपासून अथक परिश्रम घेणाऱया अधिकाऱयाचे त्यांनी कौतुकही केले. त्यानंतर मंदिर निर्माणासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्याची तयारीही दर्शविण्यात आली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि दिनेश शर्मा यांच्यासह 13 जण उपस्थित होते. जवळपास पाऊण तास चाललेल्या या बैठकीत पंतप्रधानांनी विविध सूचनाही केल्या. या बैठकीमध्ये श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला सहभागी करून न घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अयोध्या परिसर विकासांतर्गत केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे जवळपास 20 हजार कोटी रुपयांची कामे राबवणार आहेत. अयोध्येत भव्य राममंदिरासह विकास करण्यावर जोर देण्यात आला आहे. अयोध्येतून आध्यात्मिक विकास झाला पाहिजे. युवकांना संस्कार आणि आध्यात्मिक शिक्षणाचे धडे देण्याच्यादृष्टीने नियोजन केले जात आहे.