ऑनलाईन टीम / अयोध्या :
राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने राम मंदिराचा प्रस्तावित आराखडा सादर करण्यात आला. प्रसिद्ध वास्तुकार निखिल सोमपुरा यांनी या मंदिराचे नवीन डिझाईन तयार केले आहे. यामध्ये मंदिराची उंची, आकार, क्षेत्रफळ आणि मूलभूत संसरचेत काही बदल करण्यात आले आहेत.
गर्भगृहापासून मंदिराची उंची 128 फुटांवरून 161 फूट करण्यात आली आहे. घुमटांची संख्या 3 वरून 5 करण्यात आली आहे. मंदिराच्या 5 घुमटांच्या खालच्या जागेवर चार भाग असणार आहेत. त्यात सिंहद्वार, नृत्य मंडप, रंगमंडप तयार होणार आहेत. येथे भक्तांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
मंदिराच्या जमिनीचा आकार देखील वाढण्यात आला आहे. जुन्या आराखड्यानुसार मंदिराची लांबी 268.5 इंच होती. आता ती 280-300 फूट केली जाऊ शकते. मंदिराच्या भिंती सहा फुटांच्या दगडांनी बांधण्यात येणार आहेत. मंदिराचा दरवाजा संगमरवरी दगडाने बनविण्यात येणार आहे. हे मंदिर तीन मजली असून, वास्तुशास्त्रानुसार ते उभारण्यात येणार आहे. त्यासाठी साडे तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.