केशवप्रसाद मौर्य अन् दिनेश शर्माही निवडणूक रिंगणात
वृत्तसंस्था / लखनौ
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ हे अयोध्येतून निवडणूक लढणार असल्याच्या निर्णयावर भाजपच्या निवडणूक समितीने शिक्कामोर्तब केल्याचे समजते. दिल्लीत गुरुवारी भाजप निवडणूक समितीची बठक पार पडली आहे. या बैठकीत उत्तरप्रदेशच्या 172 उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. याचबरोबर उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनाही विधानसभा निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय घेतला गेल्याची चर्चा आहे. मौर्य यांना सिराथू मतदारसंघाची उमेदवारी दिली जाऊ शकते.
राज्य संघटनेशी चर्चा केल्यावर पक्षाध्यक्ष या उमेदवारांची नावे निश्चित करणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी किंवा शनिवारपर्यंत उत्तरप्रदेशातील उमेदवारांच्या नावांची घोषणा होऊ शकते. अयोध्या शहर मतदारसंघातच राम मंदिर आणि हनुमान गढीचा भाग मोडतो. येथील विद्यमान भाजप आमदार वेदप्रकाश गुप्ता यांनी मुख्यमंत्री योगींनी या मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी पत्र लिहून केली होती. 2017 च्या निवडणुकीत वेदप्रकाश गुप्ता हे 50 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले होते. योगी हे सध्या विधान परिषदेचे सदस्य आहेत. तर यापूर्वी ते 5 वेळा गोरखपूरचे खासदार राहिले आहेत.
अयोध्येत आनंदाची लाट
मुख्यमंत्री योगींचे नाव समोर आल्यावर अयोध्येत आनंदाची लाट पसरली आहे. संत समुदायाने यावर आनंदाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संत परमहंस यांनी लाडूंचे वाटप करत स्वतःचा आनंद व्यक्त केला. अयोध्येसाठी केवळ योगीच उपयुक्त आहेत. रामभक्तांवर गोळीबार करणारे आणि अयोध्येची उपेक्षा करणारे लोक मुख्यमंत्री योगींचा मुकाबला करू शकत नाहीत. मुख्यमंत्री योगींनी 5 वर्षांमध्ये अयोध्येचे स्वरुप बदलले असल्याचे म्हणणे आहे.
7 टप्प्यांमध्ये मतदान
उत्तरप्रदेशात 7 टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असून याची सुरुवात 10 फेब्रुवारी रोजी राज्याच्या पश्चिम भागातील 11 जिल्हय़ांमधील 58 मतदारसंघांमधील मतदानाने होईल. दुसऱया टप्प्यात 14 फेब्रुवारी रोजी राज्याच्या 55 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. पक्षप्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनाही निवडणूक लढविण्याचा आदेश भाजपकडून घेतला जाऊ शकतो. शर्मा यांना लखनौमधील एखाद्या मतदारसंघातून उतरविले जाऊ शकते.
बैठकीत कोण सामील?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री तसेच उत्तरप्रदेश प्रभारी धर्मेंद्र प्रधान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री पेशवप्रसाद मौर्य, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्यासह केंद्रीय निवडणूक समितीच्या अन्य सदस्यांनी पक्ष मुख्यालयातील बैठकीत भाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यात व्हर्च्युअली सामील झाले.
सहकारी पक्षांसोबत ताळमेळ
अपना दल (एस) नेत्या आणि केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी बुधवारी भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि केशवप्रसाद मौर्य यांच्यासोबत जागावाटपासंबंधी चर्चा केली आहे. तर निषाद पक्षाचे अध्यक्ष संजय निषाद यांनी स्वतःचे खासदारपुत्र प्रवीण निषाद यांच्यासोबत अमित शाह यांच्याशी चर्चा केली आहे. अनुप्रिया पटेल यांनी 20 जागांची मागणी केली असली तरीही भाजपची याकरिता तयारी नाही. मागील निवडणुकीत अपना दलाने 9 ठिकाणी विजय मिळविला होता.