अयोध्येतील रामजन्मस्थानी भव्य राम मंदीर निर्माण करण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केल्यापासून या पवित्र शहरात भूमी खरेदी करण्यासाठी उद्योगपती, धनिक, मोठय़ा कंपन्या इत्यादींची चढाओढ सुरू झाली आहे. त्यामुळे पाहता पाहता या नगरात भूमी आणि भूखंडांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अवघ्या दोन वर्षांपूर्वी एक कोटी रूपयांना मिळणाऱया भूखंडाची किंमत आता 10 कोटी रूपये झाली आहे. केवळ भारतीयच नव्हे, तर काही विदेशी कंपन्याही भूखंड खरेदीच्या या स्पर्धेत उतरल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येचा चहुमुखी विकास भव्य राममंदिराच्या निर्मितीसमवेत करण्याची योजना तयार केल्याने येथील भूखंडांना प्रचंड मागणी निर्माण झाली असल्याचे दिसून येते.
अयोध्येत भूमीची ही मागणी केवळ धार्मिक स्थळे, अतिथिगृहे आणि पर्यटकांची वसतीस्थाने बांधण्यासाठी नाही, तर येथे खेळांनाही प्रोत्साहन दिले जाणार आहे. सिंगापूरच्या सिम सिट स्पेशालिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अयोध्येत चक्क गोल्फकोर्स बनविण्याची योजना आखली असून त्यासाठी भूमीखरेदीचा प्रस्ताव दिला आहे. याशिवाय जगातील अनेक नामवंत संस्था भूमी खरेदीसाठी धडपडत आहेत.
गेल्या अवघ्या सहा महिन्यांमध्ये अयोध्येत तब्बल 350 एकर भूमीची खरेदी झाली आहे. अयोध्या शहराचा मोठा विस्तार केला जाणार असून तो 1,192 एकरमध्ये होणार आहे. ही खरेदी केलेली 350 एकर भूमी याच 1,192 एकरांचा भाग आहे. येत्या एक दोन वर्षांमध्ये या नगरीत भव्य गोल्फ कोर्स, अत्याधुनिक रुग्णालये, सोययुक्त धर्मशाळा, विविध प्रकारचे पर्यटनसंबंधी उद्योग, उत्पादन केंद्रे, वाहनतळ, आधुनिक रेल्वे स्थानक अशी अनेक आस्थापने होणार आहेत.