ऑनलाईन टीम / लखनऊ :
अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या कार्याला वेग आला आहे. मागील काही दिवसांपासून मंदिराच्या पायाभरणीसाठी खोदकाम सुरू होते. या 40 फूट खोल खोदकामात सध्या सिमेंटचे थर टाकण्याचे काम सुरू आहे. सिमेंटचे 45 थर टाकल्यानंतर 12 फूट उंच चबुतऱ्यावर मंदिराच्या गर्भगृह-मंडपाचे काम सुरू होईल. बांधकाम तज्ञांच्या सल्ल्यानुसार आरसीसीच्या आधुनिक तंत्रज्ञानाने हे काम करण्यात येत आहे. श्री राम जन्मभूमी ट्रस्टच्या अधिकृत ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
ट्रस्टी अनिल मिश्रा म्हणाले, राममंदिराचा विस्तारही आता 70 एकरावरुन 107 एकरापर्यंत वाढविण्यात आला आहे. ट्रस्टने राम जन्मभूमी परिसरात 7,285 वर्ग फूट जमीन खरेदी केली आहे. या जमिनीच्या खरेदीसाठी 1373 रुपये प्रति वर्ग फूटच्या दराने एक कोटी रुपयेही देण्यात आले आहेत. जमिनीचे मालक दीप नरैन यांनी ट्रस्टचे सचिव चंपत राय यांच्याकडे 7285 वर्ग फूट जमिनीच्या दस्तावेजची नोंदणी केली आहे.