हनुमानगढीतही घेतले दर्शन – तीर्थ योजनेत अयोध्येला सामील करणार
वृत्तसंस्था/ अयोया
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्तरप्रदेश दौऱयाच्या दुसऱया दिवशी मंगळवारी अयोध्येच्या कोतवाल हनुमानगढीमध्ये दर्शन घेतले आहे. त्यानंतर रामलल्लाच्या दरबारात जात पूजा केली आहे. उत्तरप्रदेशची निवडणूक जिंकताच दिल्लीच्या तीर्थ योजनेमध्ये अयोध्येला सामील करू असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
रामलल्लाचे दर्शन घेण्याचे भाग आज मला प्राप्त झाले. हे भाग्य प्रत्येक भारतीयाला प्राप्त व्हावे अशी माझी इच्छा आहे. उत्तरप्रदेशात आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास राज्यात राहणाऱया सर्व नागरिकांना अयोध्येत रामाचे दर्शन घडविण्यासाठी मोफत व्यवस्था करू असे केजरीवाल म्हणाले.
केजरीवाल सोमवारी शरयू आरतीत सामील झाले होते. त्यांनी महंतांसोबत शरयू नदीचा दुग्धाभिषेक केल्यावर शरयूची आरती केली होती. यावेळी त्यांच्यासोबत अखिल भारतीय निर्वाणी अनी अखाडय़ाचे श्री महंत धर्मदास, आम आदमी पक्षाचे राज्य प्रभारी आणि खासदार संजय सिंह उपस्थित होते.
दौऱयाला विरोध
अयोध्येत केजरीवालांच्या दौऱयाला विरोध देखील झाला. त्यांच्या स्वागताकरता लावण्यात आलेल्या पोस्टरवर शेण आणि काळे फासून अज्ञातांनी दौऱयाला विरोध दर्शविला आहे. तर भाजप प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी केजरीवालांच्या अयोध्या दौऱयावर निशाणा साधला आहे. स्वतःची आजी अयोध्येत कुठलीही मशीद पाडून रामलल्ला राहू शकत नसल्याचे म्हणायची, असे केजरीवाल सांगत होते. पण आज केजरीवाल यांनाच रामाच्या चरणी यावे लागले आहे. भाजपने जे सांगितले ते करून दाखविले आहे. अयोध्येत रामाचे भव्य मंदिर उभारण्यात येत असून विकासाची कामे होत आहेत. याचमुळे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना रामलल्ला आठवत असल्याचे भाजप प्रवक्त्याने म्हटले आहे.