प्रतिनिधी/ बेळगाव
शबरीमला (केरळ) मधील कोटय़ावधी भाविकांचे श्रध्दांस्थान असलेल्या अय्यप्पा स्वामी दर्शनासाठी कोरोना तपासणी सक्तीची करण्यात आली आहे. शनिवारी कर्नाटकातील धर्मादाय खात्याने या संबंधी मार्गसुची जारी केली असून केरळ सरकारच्या सुचनेनुसार दर्शनासाठी जाण्याआधी वेबसाईटमध्ये नाव नोदणी करणे सक्तीचे आहे.
मंडल-मकरविळक्कुसाठी येणाऱया भाविकांचे आरोग्य लक्षात घेवून केरळ सरकारने मार्गसुची जारी केली आहे. केरळच्या मुख्य सचिवांनी कर्नाटक सरकारला पत्र पाठवून भाविकांनी कोणती खबरदारी घ्यायची याची माहिती दिली आहे. शबरीमलाला जाणाऱया भाविकांनी https://sabarimalaonline.org या संकेतस्थळावर नाव नोंदणी करायची आहे. ज्या भाविकांना अनुमती दिली जाते त्यांनाच दर्शनासाठी मुभा आहे. सुरूवातीला रोज 1 हजार भाविकांना प्रवेश असणार आहे. नंतर ही संख्या रोज 2 हजार करण्यात येणार आहे. प्रथम नोंदणी करणाऱयांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
शबरीमलाला येण्यापूर्वी 48 तास आधी कोरोना तपासणी करणे सक्तीचे आहे. ज्या भाविकांनी तपासणी केली नाही तशा भाविकांची ऍन्टीजंट टेस्ट करण्याची व्यवस्था आहे. मात्र त्याचा खर्च संबंधितांनाच भरावा लागणार आहे. 10 वर्षांखालील मुलांना व 60 ते 65 वर्षांवरील वृध्दांना आजारपणाची लक्षणे असल्यास त्यांना प्रवेश मिळणार नाही.
आयुष्यमान कार्ड, बीपीएल कार्ड आदी कार्डधारकांनी आपल्या सोबत यात्रेदरम्यान कार्ड ठेवावे. तुपाचा अभिषेक, पंपानदी स्नान व शबरीमलामध्ये रात्रीचे मुक्काम, पंपा आणि गणपती कोविलला यंदा अवकाश नाही. यंदा यात्रीकांसाठी यरमेलु व वेदसारीकर मार्गावरच प्रवासाला अवकाश असणार आहे. गैरसोय टाळण्यासाठी केरळ सरकारने जारी केलेल्या मार्गसुचींचे पालन करण्याचे आवाहन धर्मादाय खात्याच्या अधिकाऱयांनी केले आहे.