जिवंत असल्याची कॉमेंट : पोलीस तपासाला गती
प्रतिनिधी /बेळगाव
खानापूर येथे खून झालेल्या अवस्थेत आढळून आलेल्या अरबाज मुल्ला (वय 24) या तरुणाच्या खून प्रकरणी तपासाची चपे जोरात फिरत आहेत. रविवारी दुपारी या प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळाली असून अरबाजच्या नावे अरबाजच्या ट्विटर अकौंटवरून ट्विट करण्यात आले आहे.
पोलीस दलाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. रविवारी दुपारी बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सतीशकुमार यांनी खानापूरला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन तपासासंबंधी अधिकाऱयांना सूचना केल्या आहेत.
रविवारी दुपारी अरबाजच्या ट्विटर अकौंटवरून ट्विट करण्यात आले आहे, ‘मी स्ट्राँग आहे, हेल्थी आहे, जिवंत आहे. त्यामुळे माझ्या फोटोखाली ‘आरआयपी’ टॅग करणे बंद करा’ असे लिहिण्यात आले आहे. हा प्रकार कोणी केला? याचा तपास करण्यात येत आहे. तपास अधिकाऱयांची दिशाभूल करण्यासाठी हा प्रकार केला असावा, असा संशय आहे.
सोमवारी रेल्वे पोलिसांकडून हे प्रकरण तपासासाठी खानापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. जिल्हा पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. अरबाजच्या ट्विटर अकौंटवरून ट्विट कोणी केले, यामागचा उद्देश कोणता आहे? याची चौकशी करण्यात येत आहे. संशयितांची धरपकड करून चौकशी करण्याचे सत्रही पोलिसांनी सुरूच ठेवले असून या चौकशीत नेमके काय बाहेर पडले, याचा उलगडा झाला नाही.