ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना काल पासून थोडा ताप आणि सर्दी झाली असल्याने त्यांची कोरोनाची टेस्ट केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांनी सर्व नियोजित बैठका रद्द केल्या असून स्वतःला आयसोलेट केलं आहे. रविवारी दुपारी पासूनच ते कोणालाही भेटले नाही आहेत. दरम्यान, रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी दिल्लीतील सर्व रुग्णालयात केवळ स्थानिक रुग्णांवर उपचार केले जातील तर दिल्लीबाहेर रुग्णांवर केंद्राच्या रुग्णालयात उपचार केले जातील असे सांगितले होते.
दरम्यान, दिल्लीत कोरोना ग्रस्तांची संख्या 27 हजार 654 वर पोहचली आहे. मागील चोवीस तासात दिल्लीत 1320 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर आता पर्यंत 761 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. त्यामुळे दिल्लीत चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.