स्वतःला केले आयसोलेट : उपचार सुरू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती बिघडली असून त्यांना ताप व घशात खवखव जाणवत आहे. त्यांनी स्वत:ला आयसोलेट करुन घेतले असून त्यांची कोरोना चाचणी केली जाणार असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी दिली. आजारी पडल्यामुळे रविवारपासून त्यांनी आपल्या सर्व बैठका रद्द केल्या आहेत. अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील कोरोना स्थितीची माहिती देत अनेक महत्त्वपूर्ण घोषणाही केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी कोणत्याही कार्यक्रम किंवा बैठकीला हजेरी लावलेली नाही.
दिल्लीतील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासात दिल्लीत 1,320 नवे रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 27,654 वर पोहोचली आहे. यापैकी 761 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दिल्लीत सध्या 219 कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. रविवारच्या पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी दिल्ली सरकारच्या अखत्यारितील सर्व सरकारी रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांमध्ये फक्त दिल्लीच्या नागरिकांवर उपचार होतील, तर केंद्र सरकारच्या अखत्यारितील शासकीय रुग्णालयांमध्ये देशाच्या इतर भागातून आलेल्या नागरिकांवर उपचार होतील, अशी घोषणा केली होती. तसेच उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्यांलगतच्या सीमा खुल्या करण्याची घोषणाही त्यांनी केली होती.