प्रतिनिधी/ शिरोडा
गोवा भेटीवर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी शिरोडा मतदार संघाचा दौरा केला. काराय-शिरोडा भागात त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला. यावेळी शिरोडय़ातील आपचे उमेदवार महादेव नाईक, आपचे गोवा प्रमुख राहून म्हांबरे, ऍड. अमित पालयेकर हे त्यांच्यासोबत होते.
मतदारांशी संवाद साधताना अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली मॉडेलविषयी सांगितले. आपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर गोव्यात शिक्षण व आरोग्य क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणले जातील. प्रभावी व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देतानाच रोजगाराभिमुख उद्योग व साधनसुविधा उभारण्याची हमी त्यांनी शिरोडय़ातील मतदारांना दिली. शिरोडय़ात आपला ज्याप्रकारे जनतेचा प्रतिसाद लाभत आहे, ते पाहता महादेव नाईक हे निश्चितच विजयी होतील व गोव्यात आपचे सरकार स्थापन होईल असा दावा त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला.
शनिवारी सायंकाळी 5.30 वा. अरविंद केजरीवाल काराय शिरोडा येथे दाखल झाले. महादेव नाईक यांच्यासोबत त्यांनी काराय भागात घरोघरी प्रचाराला सुरुवात केली. यावेळी मतदारांकडून त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. काही घरांमध्ये पारंपरिक आरत्या ओवाळून त्यांचे स्वागत झाले. मतदारांशी त्यांनी दिलखुलास संवाद साधला. येथील एका ज्येष्ठ नागरिकाने त्यांना आपल्या घराच्या बागेत पिकलेला केळीचा घड भेटीदाखल दिला. केजरीवाल यांनी तो प्रेमाची भेट म्हणून आनंदाने स्वीकारला. साधारण तासभर त्यांचे हे घरघर चलो अभियान सुरु होते.