पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचे सूतोवाच
प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार अरविंद पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी रविवारी स्वत: यासंबंधी सूतोवाच केले आहे.
सीपीएड मैदानावर राज्योत्सव कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्र्यांनी यासंबंधीचा खुलासा केला आहे. डीसीसी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ‘अरविंद पाटील म. ए. समितीत नाहीत. ते अपक्ष आहेत. ते लवकरच भाजपमध्ये येणार आहेत आणि आम्ही त्यांना घेणार आहे’, असे स्पष्ट केले.
‘सहकार क्षेत्रात राजकारण करू नये म्हणून डीसीसी बँक निवडणुकीत बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अरविंद पाटील यांना आपला पाठिंबा आहे’, असे त्यांनी सांगितले. ‘आमदार अंजली निंबाळकर यांच्यामागे सतीश जारकीहोळी आहेत का? या प्रश्नाला सतीश जारकीहोळी यांनी या निवडणुकीत भाग घेतलेला नाही’, असा खुलासा त्यांनी केला.
याचवेळी सीमाभागात सुरू असलेल्या पुतळय़ांच्या राजकारणावरही पालकमंत्र्यांनी भाष्य केले असून ‘पिरनवाडीत रातोरात संगोळ्ळी रायण्णा पुतळा उभारण्यात आला. त्यांना आपण पत्र दिले होते. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत. रातोरात कोणीही पुतळे उभे करण्याचा प्रयत्न केला तर तो खपवून घेतला जाणार नाही. रातोरात एखादा पुतळा उभा करणे गुन्हा आहे. त्यासाठी आवश्यक परवानगी घ्यावी लागते’, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.