वृत्तसंस्था/ बॅन चँग, थायलंड
वरिष्ठ रोवर अरविंद सिंगने रविवारी आशियाई रोईंग चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या लाईटवेट सिंगल स्कल्स प्रकारात सुवर्णपदक पटकावले तर त्याच्या अन्य तीन साथीदारांनी तीन रौप्यपदके मिळवित या स्पर्धेचा शानदार समारोप केला. भारताने या स्पर्धेत एकूण 2 सुवर्ण व 4 रौप्यपदके मिळविली.
अरविंदने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत ही शर्यत 7 मि.55.942 सेकंदात पूर्ण करीत सुवर्ण मिळविले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये अरविंद सिंग व त्याचा साथीदार अर्जुन लाल जाट यांनी पुरुषांच्या लाईटवेट डबल स्कल्समध्ये 11 वे स्थान मिळविले होते. अरविंदने येथे उझ्बेकिस्तान, चीन, व्हिएतनाम, इंडोनेशिया, थायलंड येथील तगडय़ा प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत हे यश मिळविले. अन्य तीन स्पर्धकांनी तीन रौप्यपदके मिळवित स्पर्धेचा शानदार समारोप केला. ही तीन पदके पुरुषांच्या लाईटवेट डबल स्कल्स, पुरुषांच्या क्वाड्रुपल स्कल्स आणि पुरुषांच्या कॉक्सलेस फोर प्रकारात मिळविली.
पुरुषांच्या लाईटवेट डबल स्कल्समध्ये आशिष फुगट व सुखजिंदर सिंग यांनी 7ः12.568 से. वेळ नोंदवत दुसरे स्थान मिळविले तर पुरुषांच्या क्वाड्रुपल स्कल्स प्रकारात बिट्टू सिंग, जाकर खान, मनजीत कुमार, सुखमीत सिंग यांनी अतिशय चुरशीच्या झालेल्या फोटो फिनिशमध्ये 6.33.661 से. वेळ घेत दुसरे स्थान मिळविले. त्यांचे सुवर्णपदक केवळ 0.523 सेकंदांनी हुकले. पुरुषांच्या कॉक्सलेस फोर अंतिम फेरीत जसवीर सिंग, पुनित कुमार, गुरमीत सिंग, चरणजीत सिंग यांनी रौप्य मिळविताना 6ः51.661 से. वेळ नोंदवली.
‘भारतीय रोवर्सचे आणखी एक अप्रतिम प्रदर्शन. सर्व रोवर्सचे अभिनंदन आणि सर्व रोवर्स, प्रशिक्षक, साहायक स्टाफ आणि ज्यांनी काही महिन्यापासून या संघाची पूर्ण व्यवस्था पाहिली त्या प्रशासकानाही शुभेच्छा,’ अशा भावना भारतीय रोईंग फेडरेशनचे सरचिटणीस एमव्ही श्रीराम यांनी व्यक्त केल्या. भारतीयांसाठी सतत चांगले निकाल मिळवून देणाऱऱया इस्माईल बेगचे खास अभिनंदन, असेही ते म्हणाले.
अर्जुन-रवी यांना डबलमध्ये सुवर्ण
शनिवारी अर्जुन लाल जाट व रवी यांनी पुरुषांच्या डबल स्कल्समध्ये सुवर्णपदक पटकावले तर परमिंदर सिंगने सिंगल स्कल्समध्ये रौप्यपदक मिळविले. अर्जुन व रवी यांनी चीनच्या किंग ली व लुटाँग झँग व उझ्बेकच्या दाव्रजोन दाव्रोनोव्ह व अब्दुल्लो मुखम्मदीव्ह यांना मागे टाकत पहिले स्थान मिळविले. अर्जुन व रवी यांनी ही शर्यत 6ः57.883 से. वेळेत पूर्ण केली तर चीनच्या दुकलीने 7ः02.374 से. व उझ्बेकच्या जोडीने 7ः07.734 से. वेळ नोंदवत दुसरे व तिसरे स्थान मिळविले. डबल स्कल्समध्ये मिळविलेले भारताचे हे दुसरे पदक होते. यापूर्वी 2019 मधील स्पर्धेत भारताने कांस्यपदक मिळविले होते. याआधीच्या आशियाई स्पर्धेत अर्जुनने लाईटवेट डबल स्कल्समध्ये रौप्य जिंकले होते.
शनिवारी परमिंदर सिंगने सिंगल स्कल्समध्ये रौप्य मिळविताना 8ः07.323 से. वेळ नोंदवली तर सुवर्णविजेत्या उझ्बेकच्या खोल्मुरझाएव्ह शाखबोजने 11 सेकंद कमी घेत 7ः56.307 से. वेळेत शर्यत पूर्ण केली. इंडोनेशियाच्या मेमोने 8ः10.055 से. वेळेत शर्यत पूर्ण करीत कांस्यपदक मिळविले.