ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यातील लॉकडाऊन 17 मे पर्यंत लांबल्याने गँगस्टर अरुण गवळीच्या पॅरोल मुदतीत 24 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गवळीची यासंदर्भातील याचिका मंजूर केली आहे.
शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर याच्या हत्येप्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. पत्नी गंभीर आजारी असल्याने त्याला 45 दिवसांच्या पॅरोलवर सोडण्यात आले होते. त्यानुसार त्याला 27 एप्रिलरोजी कारागृहात आत्मसमर्पण करायचे होते. मात्र, लॉकडाऊनमुळे त्याला यापूर्वी 10 मे पर्यंत मुदतवाढ दिली होती. आता लॉकडाऊनची मुदत वाढल्याने गवळीला दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांनी गवळीची या संदर्भातील याचिका मंजूर केली. त्यानुसार गवळीला 24 मे पॅरोल मुदतवाढ मिळाली आहे.