केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे भावपूर्ण उद्गार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भाजपचे दिवंगत नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासोबत असलेल्या मैत्री संबंधांचे स्वरुप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी व्यक्त केले आहे. संकटात असताना जेटली यांनीच त्यातून बाहेर काढले होते असे उद्गार शाह यांनी सोमवारी काढले आहेत.
जेटली वयाने माझ्यापेक्षा मोठे असले तरीही माझ्यावर संकट आले असता अनेकांना मदत केली, परंतु जेटलींनी प्रत्येकक्षणी मोठय़ा भावाची भूमिका बजावून बोट पकडून मला या पूर्ण संकटातून बाहेर काढले होते. जेटली जराही न घाबरता माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहिले होते. त्यांनी नेहमीच मला साथ दिली, गरज भासली असता ते स्वतः प्रसारमाध्यमांना सामोरे गेले आणि संसदेतही बोलण्यास मागे हटले नाहीत असे भावपूर्ण उद्गार शाह यांनी काढले आहेत.
रोहन जेटली यांचा (अरुण जेटली यांचे पुत्र) पुतळय़ाच्या अनावरण कार्यक्रमात उपस्थित राहू शकता का अशी विचारणा करणारा फोन आला होता. या पुतळय़ाचे अनावरण एखाद्या क्रिकेटपटूकडून का केले जाऊ नये असा विचार माझ्य़ा मनाला शिवला होता. सौरव गांगुली, गौतम गंभीर यांची नावे सुचली होती, परंतु मी स्वतःला रोखू शकलो नाही. जेटलींच्या पुतळय़ाच्या अनावरणाची ही संधी मीच घ्यावी असा मोह झाला. याचमुळे मी त्वरित होकार दिल्याचे शाह यांनी म्हटले आहे. 10 वर्षे राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपदी असताना जेटलींनी सत्तापक्षाला झोप लागू दिली नाही. सभागृहाची प्रतिष्ठा राखत आक्रमकतेसह युक्तिवाद करण्यात त्यांचा हातखंडा होता असे शाह म्हणाले.