ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नाडिस यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदा सात जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला असून मॉरिशसचे माजी पंतप्रधान अॅनरुड जुगनॉथ, बॉक्सिंगपटू मेरी कोम, चन्नूलाल मिश्रा, विश्वेष तीर्थ स्वामी (मरणोत्तर) यांचीदेखील पद्मविभूषण पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
केंद्र सरकारने सात जणांची पद्मविभूषण, 16 जणांची पद्मभूषण तर 118 जणांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड केली आहे. माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह उद्योगपती आनंद महिंद्रा, वेणू श्रीनिवासन, नागालँडचे माजी मुख्यमंत्री सी. जे. जमीर, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, जम्मू काश्मीरमधले नेते मुझफ्फर हुसेन बेग यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर पोपटराव पवार, राहीबाई पोपेरे, झहीर खान, रमण गंगाखेडकर, करण जोहर, सरिता जोशी, एकता कपूर, कंगना राणौत, अदनान सामी आदींची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे.