मोहन मोरे बीपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
वैभव कुरूबागीची आक्रमक फलंदाजी, अनिलगौडा पाटील व अर्जुन पाटील यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अर्जुनवीर श्री साई सोशल संघाने साई स्पोर्ट्स हुबळी संघाचा अटीतटीच्या लढतीत 17 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. अनिलगौडा पाटीलला सामनावीर तर वैभव कुरूबागीला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
युनियन जिमखाना मैदानावर सोमवारी खेळविण्यात आलेल्या दुसऱया क्वालिफायर सामन्यात साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्विकारली.
प्रथम फलंदाजी करताना अर्जुनवीर साई सोशल संघाने 20 षटकात 9 बाद 144 धावा केल्या. त्यात वैभव कुरूबागीने 2 षटकार 1 चौकारासह 33, अमेय भातकांडेने 1 षटकार 4 चौकारासह 29, सुजय सातेरीने 2 चौकारासह 25 तर विजय पाटीलने 1 षटकार 2 चौकारासह 21 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाने 20 षटकात 9 बाद 127 धावाच केल्या. यश कळसण्णावरने 1 षटकार 2 चौकारासह 34, तर राज दंगण्णावरने 17 धावा केल्या. अर्जुनवीरतर्फे अनिलगौडा पाटीलने 18 धावात 3, अर्जुन पाटीलने 22 धावात 2, वैभव कुरूबागीने 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे मिलिंद भातकांडे, चंदन कुंदरनाड, सुधाकर चाळके, विनायक हुबळीकर यांच्या हस्ते सामनावीर अनिलगौडा पाटील, इम्पॅक्ट खेळाडू व सर्वाधिक षटकार वैभव कुरूबागी, उत्कृष्ट झेल विजय पाटील यांना चषक देवून गौरविण्यात आले. अंतिम सामना मंगळवारी अर्जुनवीर श्री साई सोशल व ऍक्सेस डेव्हलपर्स सीसीआय यांच्यात दुपारी 1 वा. खेळविण्यात येणार आहे.