‘डीआरडीओ लेझर गाईडेड अँटी टँक’ क्षेपणास्त्राची चाचणी : डोळेझाक होण्यापूर्वीच शत्रू उद्ध्वस्त होणार
प्रतिनिधी / नगर, नवी दिल्ली
वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) ताणतणावाची स्थिती असतानाच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेला (डीआरडीओ) आणखी एक मोठे यश मिळाले आहे. एमबीटी अर्जुन टँककडून लेझर गाईडेड अँटी टँक क्षेपणास्त्राची (एटीजीएम) यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. ‘एमबीटी अर्जुन’ रणगाडय़ावरून या क्षेपणास्त्राचे अहमदनगरमधील केके रेंज (एसीसी अँड एस) येथे परीक्षण करण्यात आले. या यशाबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओच्या अधिकारी-तंत्रज्ञांचे विशेष अभिनंदन केले आहे.
लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून शस्त्रसज्जतेसाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीच्या यशस्वीतेनंतर ‘नजीकच्या काळात आयात निर्भरता कमी करण्याच्या दिशेने काम करणाऱया डीआरडीओचा भारताला अभिमान आहे’ असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे. या यशस्वी चाचणीमधून हे क्षेपणास्त्र तीन किलोमीटरपर्यंत असलेल्या लक्ष्याला यशस्वीरित्या भेदू शकते हे सिद्ध झाले. तसेच हे क्षेपणास्त्र विविध प्लॅटफॉर्मवरून लॉन्च क्षमतेसह विकसित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत एमबीटी अर्जुनच्या एका बंदुकीमधून तांत्रिक मूल्यांकन चाचणी फत्ते झाल्याची माहिती डीआरडीओने दिली आहे. भारताकडे आधीपासूनच ‘नाग’सारखे मार्गदर्शित क्षेपणास्त्र आहे. तिला सध्या नॅमिका मिसाईल कॅरियरमधून सोडण्यात आले आहे. ‘नाग’ क्षेपणास्त्र कोणत्याही हवामानात मोठय़ा उपकरणांनाही लक्ष्य करू शकते. आता नव्याने लॉन्च करण्यात आलेल्या क्षेपणास्त्रामध्ये इन्फ्रारेडची सुविधा असल्यामुळे हे क्षेपणास्त्र अचानक वर येते आणि मग जलद गतीने कोणत्याही स्थितीत वळून लक्ष्यभेद करू शकणार आहे.
‘लक्ष्य’भेद…
- तीन कि.मी. अंतरावरील लक्ष्याचा अचूक वेध
- अहमदनगरमधील केके रेंज तळावर परीक्षण
- ‘डीआरडीओ’च्या शिरपेचात मानाचा नवा तुर