वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱया खेळाडूंचा प्रत्येक वर्षी केंद्र शासनातर्फे विविध पुरस्कार देवून गौरव केला जातो. अर्जुन पुरस्कारासाठी भारतीय पुरूष फुटबॉल संघातील बचावफळीत खेळणारा संदेश झिंगन तसेच भारतीय महिला फुटबॉल संघातील हुकमी स्ट्रायकर एन. बाला देवी यांची शिफारस अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनतर्फे करण्यात आली आहे.
26 वर्षीय झिंगनने भारतीय फुटबॉल संघामध्ये गेल्या काही वर्षात आपले स्थान अधिक भक्कम करताना कामगिरीत सातत्य राखले आहे. कर्णधार सुनील छेत्रीनंतर भारतीय संघातील भरवशाचा फुटबॉलपटू म्हणून झिंगनकडे पाहिले जाते. 2015 साली फिफाच्या विश्व करंडक पात्र फेरीच्या फुटबॉल सामन्यात त्याने भारतीय संघात आपले पदार्पण केले. त्याचप्रमाणे भारतीय महिला फुटबॉल संघामध्ये मणीपूरच्या 30 वर्षीय बाला देवीने आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे. स्कॉटलंडच्या एका फुटबॉल क्लबबरोबर बाला देवीने 18 महिन्यांचा करार केला असून विदेशातील फुटबॉल क्लबशी करार करणारी बाला देवी ही
भारताची पहिली महिला फुटबॉलपटू म्हणून ओळखली जाते.