के. आर. शेट्टी स्मृती टी-20 क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
के. आर. शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित के. आर. शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाने विश्रुत स्ट्रायकर्स संघाचा 10 गडय़ांनी पराभव करून 2 गुण मिळविले. पावसाच्या व्यत्ययामुळे दुसरा सामना रद्द करण्यात आला. अष्टपैलू स्वप्निल एळवेला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिला सामना पावसामुळे 15 षटकांचा खेळविण्यात आला. विश्रुत स्ट्रयकर्सने 15 षटकात 8 बाद 115 धावा केल्या. विजयकुमार पाटीलने 1 षटकार 3 चौकारासह 42, तेजस पवारने 1 षटकार 4 चौकारासह 26, सुदीप सातेरीने 4 चौकारासह 22 धावा केल्या. अर्जुन स्पोर्ट्सतर्फे फरहान पाटीलने 27 धावात 3, वसंत शहापूरकरने 22 धावात 2, ज्ञानेश होनगेकरने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाने 11.5 षटकात बिनबाद 121 धावा करून सामना 10 गडय़ांनी जिंकला. त्यात स्वप्निल एळवेने 3 षटकार 3 चौकारासह 34 चेंडूत 59, तर परिक्षित उकुंडीने 1 षटकार 6 चौकारासह 57 धावा करून दोघांनीही अर्धशतके झळकविली. स्वप्निल व परिक्षित यांनी पहिल्या गडय़ासाठी नाबाद 121 धावांची भागीदारी करत स्पर्धेत नवा विक्रम नोंदविला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे वाहिद शेख, मेहबूब सावनूर, चंदन कुंदरनाड, राहुल मगदूम, प्रणय शेट्टी यांच्या हस्ते सामनावीर व सर्वाधिक षटकार स्वप्निल एळवे, इम्पॅक्ट खेळाडू फरहान पाटील, उत्कृष्ट झेल संतोष सुळगे पाटील यांना चषक देवून गौरविण्यात आले.
बुधवारचे सामने
साईराज वॉरियर्स वि. के. आर. शेट्टी किंग्स सकाळी 9.30 वा. विश्रुत स्ट्रायकर्स वि. झेवर गॅलरी डायमंड दु. 1.30 वा.