के. आर. शेट्टी स्मृती टी-20 क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
के. आर. शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित के. आर. शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाने बीसीसी मच्छे संघाचा 10 गडय़ांनी पराभव केला. पावसाच्या व्यत्ययामुळे दुसरा सामना रद्द करावा लागला. 85 धावा व 1 गडी बाद करणाऱया अष्टपैलू स्वप्निल एळवेला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात बीसीसी मच्छे संघाने 20 षटकात 8 बाद 124 धावा केल्या. शिवप्रकाश हिरेमठने 2 षटकार 4 चौकारासह 51, मनोज पाटीलने 2 षटकार 1 चौकारासह 24, भरत गाडेकरने 14 धावा केल्या. अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्सतर्फे फरहान पाटीलने 16 धावात 2, वसंत शहापूरकरने 23 धावात 2, स्वप्निल एळवेने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाने 11.5 षटकात बिनबाद 125 धावा करून सामना 10 गडय़ांनी जिंकला. स्वप्निल एळवेने 3 षटकार 7 चौकारासह 45 चेंडूत 85 धावा करून नाबाद अर्धशतक झळकविले.
त्याला परिक्षित उकुंडीने 4 चौकारासह नाबाद 33 धावा करून सुरेख साथ दिली. स्वप्निल व परिक्षित यांनी पहिल्या गडय़ासाठी नाबाद 125 धावांची भागीदारी केली. के. आर. शेट्टी किंग्स व रायजिंग स्टार यांच्यातील दुसरा सामना सुरू असतानाच पावसाने हजेरी लावल्यामुळे सामना रद्द करावा लागला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे रामचंद्र मन्नोळकर, नागेश मन्नोळकर, नागेश सराफ, सागर मंडोळकर, काशिनाथ नाईक, पुनीत शेट्टी, प्रणय शेट्टी यांच्या हस्ते सामनावीर व सर्वाधिक षटकार स्वप्निल एळवे, इम्पॅक्ट खेळाडू शिवप्रकाश हिरेमठ, उत्कृष्ट झेल गणेश कंग्राळकर यांना चषक देवून गौरविण्यात आले.
मंगळवारचे सामने
विश्रुत स्ट्रायकर्स वि. अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स सकाळी 9.30 वा., मार्ग रायजिंग स्टार वि. बीसीसी मच्छे दु. 1.30 वा.