वृत्तसंस्था/ साओ पावलो
कोपा अमेरिका चषक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी येथे झालेल्या अ गटातील सामन्यात मेसीच्या बलाढय़ अर्जंटिना संघाने उरूग्वेचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव करत पूर्ण गुण वसूल केले. या स्पर्धेत आता अ गटात अर्जेंटिना आणि चिली प्रत्येकी 4 गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत.
शुक्रवारचा सामना शेवटपर्यंत अटीतटीचा झाला. 13 व्या मिनिटाला मेसीने डाव्या बगलेतून दिलेल्या पासवर मध्यफळीतील ग्युडो रॉड्रिग्जने हेडरद्वारे अर्जेंटिनाचा एकमेव निर्णायक गोल नोंदविला. या स्पर्धेतील यापूर्वी झालेल्या सामन्यात चिलीने बोलिव्हियाचा 1-0 असा पराभव करून पूर्ण गुण वसूल केले होते. या सामन्यात चिली संघातील बेन ब्रेरटोनने एकमेव गोल नोंदविला होता.
या स्पर्धेत झालेल्या यापूर्वीच्या सामन्यात अर्जेंटिनाला चिली संघाने 1-1 असा बरोबरीत रोखले होते. अर्जेंटिनाचा या स्पर्धेतील पुढील सामना सोमवारी पराग्वे बरोबर होणार आहे. तसेच उरूग्वेचा या स्पर्धेतील दुसरा सामना सोमवारीच चिलीविरुद्ध खेळविला जाईल. या स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिले चार संघ बाद फेरीत प्रवेश करतील.