ऑनलाईन/टीम
संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटीनानं ब्राझीलला धूळ चारत कोपा अमेरिका स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला. अर्जेंटिनानं ब्राझीलला १-० अशा फरकानं विजेतेपदावर नाव कोरलं. मारियाने केलेल्या एकमेव गोलमुळे अर्जेंटिनाच्या विजयाचा मार्ग सुखर झाला. दरम्यान, कोपा अमेरिका स्पर्धेत ब्राझील आणि अर्जेंटिना हे दोन संघ या चषकासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यामुळे दोन्ही संघाकडून विजेतेपद पटकावण्यासाठी कडवी झुंज दिली जाईल, असं बोललं जात होतं. परंतु अखेर अर्जेंटिनानं बाजी मारली.
अर्जेंटिनाने तब्बल २८ वर्षांनंतर कोपा अमेरिका स्पर्धेचा किताब जिंकला आहे. यापूर्वी १९९३ मध्ये अर्जेंटिनानं हा किताब आपल्या जिंकला होता. फुलबॉलप्रेमींच्या अपेक्षेप्रमाणेच सामना चुरशीचा झाला. या विजयासह अर्जेंटिनानं १५ वेळा किताब जिंकण्याच्या उरुग्वेच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे.
दरम्यान, लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली खेळणारा अर्जेंटिना आणि नेमारचा ब्राझील संघ हे पारंपरिक प्रतिस्पर्धी अंतिम फेरीत दाखल झाल्यानं संपूर्ण फुटबॉल जगताचं लक्ष या सामन्याकडं होतं. सामना चुरशीचा होणार हे माहित होत. दोन्हीही संघ तुल्यबळ होते. सामन्यातील पहिल्या २० मिनिटांत दोन्ही संघात चांगलीच झुंज बघायला मिळाली. दोन्हीकडून तोडूस तोड प्रतिकार केला जात असल्यानं कुणालाही गोलपोस्टपर्यंत पोहोचताच आलं नाही. पण, २२ व्या मिनिटाला एंजल डी. मारिया संघाच्या मदतीला धावला. मारियाने पहिला गोल नोंदवत अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनाने सामन्यात घेतलेली ही आघाडी ब्राझीलला अखेरपर्यंत तोडता आली नाही.