जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा : मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव क्लब येथे बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटना आयोजित जिल्हास्तरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अर्णा, प्रितम, तनिष्का, माहिम, नताशा, आदित्य, मीनाज व रिहा मंतेरो, नवनीत रजपूत व अनिष उपाध्ये यांनी विजेतेपद पटकाविले.
बेळगाव क्लब येथे झालेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत 11 वर्षाखालील मुलींच्या गटात अर्णा असुंडी हिने अल्ड्रीन ऍन्थोनी हिचा 21-9, 21-13 तर मुलांच्या गटात प्रितम निलगीने हार्दान असुंडीचा 21-14, 23-25, 21-12 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले. 13 वर्षाखालील मुलींच्या गटात तनिष्का के हिने अदिती ए हिचा 21-7, 21-12 तर मुलांच्या गटात माहिमने प्रितमचा 21-17, 13-21, 21-11 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले.
15 वर्षाखालील मुलींच्या गटात अंतिम सामन्यात नताशा के हिने वर्षा जी हिचा 21-13, 21-6 तर मुलांच्या अंतिम सामन्यात आदित्य यशने माहिमचा 21-12, 21-14 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.
मिरनाज-रेहा मंतेरो विजयी
महिलांच्या दुहेरीत अंतिम सामन्यात मिरनाज इरानी व रेहा मंतेरो या जोडीने सलोनी के. व ऐश्वर्या या जोडीचा 21-18, 25-23 अशा सेटमध्ये तर पुरूषांच्या दुहेरीत अंतिम सामन्यात दर्शन नवनीत रजपुत व अनिष उपाध्ये या जोडीने दर्शन कुलकर्णी व आदित्य सिंगनमुखी या जोडीचा 22-24, 21-14, 21-11 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक एन. सतीशकुमार, एडीसी रघुराम, स्पर्धेचे प्रमुख पुरस्कर्ते अजय सनदी, अजय असुंडी, संघटनेचे सचिव अशोक पाटील, प्रसन्ना खारापूर, भूषण अणवेकर आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या स्पर्धकांना चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.