प्रतिनिधी/ सातारा
बँकींग क्षेत्रातील तज्ञ, युनायटेड वेस्टर्न बॅंकेचे माजी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी व खासगी बॅंक संघटनेचे ते पहिले अध्यक्ष, सारस्वत बँकेचे संचालक प्रभाकर नारायण उर्फ पी. एन. जोशी यांचे मंगळवार दि. 1 रोजी वयाच्या 89 व्या वर्षी त्यांच्या कांगा कॉलनीतील घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीने मुले, सुना, नांतवडे असा परिवार आहे.
नामवंत अर्थतज्ञ म्हणून देशभर ओळख असलेल्या जोशी यांचा जन्म चिक्कोडी (कर्नाटक) येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चिक्कोडी व बेळगाव या ठिकाणी झाले. उच्च शिक्षणासाठी ते मुंबईत आले. मुंबई विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र व इतिहास या विषयांतून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या अर्थशास्त्र विभागात सुमारे 15 वर्ष काम केले. त्यानंतर ते त्याच ठिकाणी वरिष्ठ अधिकारी झाले. त्यांनी बॅंक ऑफ इंडियात महाव्यवस्थापक म्हणून काम केले.
तेथील त्यांच्या कामाची दखल घेत रिझर्व्ह बॅंकेने त्यांची युनायटेड वेस्टर्न बॅंकचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड केली. 1990 ते 2000 या दहा वर्षाच्या काळात त्यांनी बॅंकेच्या प्रगतीत योगदान दिले. या काळात त्यांनी बॅंकेच्या कामकाजात अमुलाग्र बदल केले. संगणकीकरण, एटीएम केंद्र, फॉरेन एक्सजेंज, पब्लिक इश्यू राईटस् या राबविलेल्या अभिनव उपक्रमांची चांगली चर्चा झाली. त्यानंतर ते सारस्वत सहकारी बॅंकचे बॅंकिग डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. त्याबरोबरच सध्या ते येथील शास्त्र महाविद्यालयचे सदस्य, तसेच धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाच्या एमबीए कॉलेजचे गव्हर्निंग बॉडी सदस्य होते. त्याचबरोबर अण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त व पी. एन. जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष होते. त्यांची माय मेमरीज-गिलीम्सेस ऑफ चेंजिंग बॅंकिंग सिनॅरिओ, बॅंकिंग आणि वित्त धोरण-एक परामर्श, बदलत्या बॅंकिंगच्या छटा-माझ्या आठवणी (मराठी) व नॅशनल बॅकिंग पॉलिसी फॉर इनक्लूसिव्ह डेव्हलपमेंट ही पुस्तकं चांगली गाजली.
संगम माहुलीतील कैलास स्मशानभूमीत जोशींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी जेष्ठ शास्त्र दत्ताप्रदास दाभोळकर, बँकींग तज्ञ श्रीराम नानल, विचारवंत किशोर बेडकिहाळ, जेष्ठ पत्रकार दिनकर झिंब्रे, पत्रकार संघाचे सर चिटणीस दीपक प्रभावळकर, युनायटेडचे माजी जनरल मॅनेजर रत्नाकर तांडेल, माजी व्यवस्थापक अनंत जोशी, सदाशिव क्षिरसागर, बॅंकेच्या अधिकारी संघटनेचे माजी अध्यक्ष डी. आर. देशपांडे, जनरल सेक्रेटरी दत्तात्रय भिडे, आयडीबीआय बॅंक अधिकारी संघटनेचे माजी अध्यक्ष दिलीप वेलणकर, अध्यक्ष गोपाल जरे, सचिव भालचंद्र दामले, बॅंकचे माजी अध्यक्ष व जोशी यांचे पी. ए. विनायक कुलकर्णी, चंद्रशेखर नावलीकर आदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच साताऱयाचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी, त्यांचे सहकारी अरूण गोडबोले, विश्वास दांडेकर, नगरसेविका स्नेहलता नलावडे, पूर्वा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. चंद्रकांत नलावडे, मराठा सेवा संघाचे युवराज पवार यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचे अत्यंदर्शन घेतले. त्यांच्या निधनाने साताऱयातून चांगला अर्थतज्ञ व आदर्श व्यक्तीमत्व गेल्याचे दुखः यावेळी सर्वांनी व्यक्त केले.