देशाच्या आर्थिक स्थितीसंबंधी होणार विचारमंथन
नवी दिली/ वृत्तसंस्था
देशाची आर्थिक स्थिती आणि कोरोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेविषयी चर्चा करून आढावा घेण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 3 सप्टेंबर रोजी एफएसडीसी म्हणजेच फायनान्शियल स्टॅबिलिटी ऍन्ड डेव्हलपमेंट कौन्सिलची बैठक बोलावली आहे. या बैठकीत केंद्र सरकारने अलिकडेच मांडलेल्या सरकारी मालमत्तांच्या मॉनिटायझेशनच्या प्रस्तावासंबंधीही आढावा घेतला जाणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक होईल. या आर्थिक वर्षातील ‘एफएसडीसी’ची ही पहिली बैठक आहे. यापूर्वी 15 डिसेंबर 2020 ला या कौन्सिलची बैठक झाली होती.
कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यापासून देशाच्या अर्थकारणात सध्या रिकव्हरीचे संकेत मिळू लागले आहेत. सरकारजमा झालेल्या जीएसटीच्या माध्यमातून अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे दिसून येत आहे. तसेच चालू अर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकासदर 20 टक्क्यांच्या आसपास राहील असा अदांज वर्तवण्यात आला आहे. गेल्या वषी या तिमाहीत भारताचा विकास दर उणे 24.4 इतका राहिला होता. हा दर सुधारल्यामुळे अर्थतज्ञांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.