कारखाना उत्पादनाचा 10 वर्षांमधील उच्चांक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाबाधेमुळे थंडावलेली अर्थव्यवस्था आता पुन्हा रूळावर येत असल्याचे समाधानकारक संकेत एकापाठोपाठ एक मिळत असून त्यामुळे अर्थक्षेत्रात उत्साह संचारला आहे. ऑक्टोबरमध्ये गेल्या आठ महिन्यातील सर्वात जास्त वस्तू-सेवा कर संकलन झाल्याच्या वृत्तानंतर आता औद्योगिक उत्पादनाच्या संदर्भातही असेच शुभवृत्त देण्यात आले आहे. ऑक्टोबरातच कारखाना उत्पादनाने गेल्या 10 वर्षांमधील उच्चांक गाठला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
निक्की उत्पादन खरेदी व्यवस्थापक निर्देशांक या विश्वासार्ह संस्थेने यासंबंधी माहिती दिली. ऑक्टोबरमध्ये हा निर्देशांक 58.9 या पातळीवर पोहचला. यापूर्वी मे 2010 मध्ये ही पातळी गाठली गेली होती. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांमध्ये सलगपणे या निर्देशांकात वाढ झाली आहे.
वाहन कंपन्यांची चांदी
सणासुदीचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱया ऑक्टोबरमध्ये वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ पहावयास मिळाली आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्यापेक्षा ती 18 टक्क्यांनी जास्त आहे. लॉकडाऊनमुळे लोकांनी वाहन खरेदी पुढे ढकलली होती. आता मागच्या तीन महिन्यांमधील कमजोर खरेदीची भरपाई होत आहे.
डिझेलची विक्रमी विक्री
लॉकडाऊनच्या काळात वाहने बव्हंशी बंद असल्याने डिझेलची विक्री घटली होती. तथापी, ऑक्टोबरात डिझेल विक्रीने कोरानापूर्व काळापेक्षाही अधिक मजल मारली आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपेक्षा या ऑक्टोबरमध्ये डिझेल विक्री 6.6 टक्के अधिक आहे. तर नैसर्गिक वायूच्या विक्रीत 27.5 टक्के वाढ झाली आहे. याचाच अर्थ आता उत्पादनांना मागणी वाढत आहे, असे तज्ञांचे मत आहे.
राज्यांना कराचे वितरण
कोरोना काळात राज्यांचे वस्तू-सेवा कराचे उत्पन्न घटले होते. केंद्र सरकार त्याची भरपाई करीत आहे. राज्यांना या कराच्या वितरणाचा दुसरा हप्ता म्हणून 6 हजार कोटी रूपयांचे वाटप करण्यासाठी केंद्र सरकारने निधी दिला आहे. तो 16 राज्ये व 3 केंद्रशासित प्रदेशांना मिळणार आहे. यापूर्वी 12 हजार कोटी रूपयांचे वितरण करण्यात आले आहे. करातील त्रुटी 1.1 लाख कोटींची आहे.