तिरुअनंतपुरम
केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी विधानसभेत शुक्रवारी अर्थसंकल्प मांडला आहे. पण अर्थसंकल्पापेक्षाही त्याच्या मुखपृष्ठाने अधिक लक्ष वेधून घेतले आहे. अर्थसंकल्प प्रतीच्या मुख्यपृष्ठावर गांधी हत्येचे दृश्य रेखाटण्यात आले असून अर्थमंत्र्यांनी ही कृती योग्य ठरविली आहे.
अर्थसंकल्पाच्या मुख्यपृष्ठावर मल्याळी चित्रकाराने साकारलेले गांधी हत्येचे दृश्य आहे. या चित्राद्वारे गांधींची हत्या कुणी केली होती हे न विसरण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न आहे. इतिहासाचे पुनर्लेखन होत असताना ही कृती अत्यंत आवश्यक ठरत असल्याचे थॉमस यांनी म्हटले आहे.
डाव्या पक्षांच्या सरकारवर भाजप नेते टॉम वडक्कन यांनी टीका केली आहे. गांधी यांच्या हत्येचा केरळ सरकार एकप्रकारे जल्लोष करत आहे. गांधींच्या हत्येचे दृश्य छापून डाव्या पक्षांच्या सरकारच्या काळात लोकांची हत्या होत असल्याचा संदेश मिळत असल्याचे वडक्कन म्हणाले.