जवळची जलवाहिनी तात्पुरती हलविली, प्रवाशांची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने विचार
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण-कारवार मार्गावरील अर्धफोंड पुलाचे दुरुस्तीकाम अर्ध्या टप्प्यात आलेले असून माशे येथील पुलाच्या दुरुस्तीच्या कामालाही ठेकेदाराने प्रारंभ केला आहे. माशे येथील पुलावरून 2009 साली ज्यावेळी काणकोण तालुक्यात पूर आला होता त्या वेळी पाणी गेले होते आणि पूल वाहतुकीला धोकादायक बनला होता. या पुलावरून सध्या अवजड वाहनांना जाण्यास बंदी असून पुलाच्या शेजारून जलवाहिनी, दूरध्वनी वाहिन्या गेलेल्या आहेत. पुलाच्या दुरुस्तीला प्रारंभ करण्याअगोदर जलवाहिनी इतरत्र हलविणे आवश्यक बनले होते. त्यानुसार ठेकेदाराने सदर जलवाहिनी तात्पुरती हलविली आहे. त्यामुळे काम सुलभ होणार आहे.
या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू केल्याने माशे ते चावडी-काणकोणपर्यंत बसने प्रवास करणाऱया प्रवाशांचा खोळंबा होणार आहे. माशे, कारय, पैंगीण, पर्तगाळ, अर्धफोंड, भाटपाल, मोखर्ड, श्रीस्थळ, खालवडे, शेळेर या भागांतून चावडी आणि अन्यत्र कामांनिमित्त तसेच अन्य कारणांसाठी जाणाऱया नागरिकांची गैरसोय कशी दूर करावी हा मोठा पेंच सध्या कदंब महामंडळ तसेच खासगी बसमालकांसमोर निर्माण झाला आहे. अर्धफोंड पुलाच्या दुरुस्तीमुळे सदर मार्गावरून अवजड वाहनांबरोबरच कदंब आणि कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसेसची वाहतूक पूर्णपणे बंद आहे. या मार्गावरून केवळ मिनी बसेस तेवढय़ा ये-जा करत आहेत. माशे ते शेळेरपर्यंतच्या प्रवाशांची तात्पुरती सोय करण्यासाठी डॉ. पावस्कर यांचे क्लिनिक ते अर्धफेंडपर्यंत बससेवा सुरू करण्याची गरज आहे. त्यासाठी मिनी बसेसचा वापर करतानाच या बसेस अर्धफोंड ते पैंगीण आणि मग गालजीबागमार्गे मनोहर पर्रीकर मार्गावरून चावडी अशी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने कदंब महामंडळ विचार करत असल्याची माहिती मिळाली आहे. सद्यपरिस्थितीत चावडी ते पोळे पैंगीणमार्गे शटल बससेवा सुरू करणे अशक्य असून त्या जागी चावडीवरील कदंब बसस्थानक ते माशे अशी मिनी बससेवा मोखर्ड, पर्तगाळ, पैंगीण, कारयमार्गे सुरू करण्याच्या दृष्टीने कदंबचे अधिकारी विचार करत आहेत. अर्धफोंड आणि माशे या दोन्ही पुलांची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. पुलांची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत या मार्गावरील प्रवाशांची सोय कशी करावी याचा सकारात्मक विचार सध्या महामंडळाचे अधिकारी करत आहेत, अशी माहिती कदंबच्या अधिकाऱयांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली.