भारताचा पहिला डाव 223 धावांवर खुर्दा, स्पीडस्टार कॅगिसो रबाडाला 4 तर मार्को जान्सनला 3 बळी
केपटाऊन / वृत्तसंस्था
कर्णधार विराट कोहलीने (201 चेंडूत 79) झुंझार अर्धशतक झळकावले असले तरी यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव सर्वबाद 223 धावांवर गुंडाळला गेला. अलीकडील कालावधीत विराट कोहली सातत्याने खराब फॉर्ममध्ये होता. मात्र, येथे आपल्या नेहमीच्या फलंदाजी शैलीला मुरड घालत या दिग्गज फलंदाजाने तडफदार खेळी साकारली. त्या तुलनेत काही प्रमाणात चेतेश्वर पुजाराचा (43) अपवाद वगळता अन्य भारतीय फलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केली.
दिवसअखेरीस दक्षिण आफ्रिकेची 8 षटकात 1 बाद 17 अशी खराब सुरुवात झाली. आपली चारही षटके निर्धाव टाकणाऱया बुमराहने एल्गारला (3) पुजाराकरवी झेलबाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. मॅरक्रम 8 तर नाईट वॉचमन केशव महाराज 6 धावांवर खेळत होते.
तत्पूर्वी, भारतीय सलामीवीर स्वस्तात गारद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी तोच कित्ता गिरवल्याने बिकट स्थिती होती. मात्र, विराट व पुजारा यांच्या संघर्षमय खेळामुळे भारताला सव्वादोनशे धावांच्या उंबरठय़ापर्यंत पोहोचता आले. दक्षिण आफ्रिकन संघातर्फे जलद गोलंदाज कॅगिसो रबाडाने 22 षटकात 73 धावात 4 तर नवोदित डावखुरा स्पीडस्टर मार्को जान्सनने 18 षटकात 55 धावात 3 बळी घेतले. याशिवाय, ऑलिव्हिएर (1-42), एन्गिडी (1-33) व केशव महाराज (1-14) यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, केएल राहुल (12) व मयांक अगरवाल (15) हे दोन्ही सलामीवीर अतिशय स्वस्तात बाद झाल्याने संघाची 2 बाद 33 अशी खराब सुरुवात झाली. रबाडा व ऑलिव्हिएर या स्पीडस्टर्सनी पहिल्या तासात जलद गोलंदाजीला अनुकूल स्थितीचा लाभ घेत दोन्ही सलामीवीरांना तंबूत धाडले. आपली 50 वी कसोटी खेळत असलेल्या रबाडाने सातत्याने ऑफ स्टम्पवर मारा केला. मयांकला रबाडाच्या डावातील तिसऱया षटकात शून्यावर जीवदान मिळाले. मात्र, याचा तो अजिबात लाभ घेऊ शकला नाही.
भारताची 2 बाद 33 अशी बिकट स्थिती असताना विराट व पुजारा ही जोडी एकत्रित आली. दुसऱया कसोटीत खेळू न शकलेल्या विराटने संयमावर अधिक भर देत पुजाराच्या साथीने डाव सावरण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. मागील सामन्यात अर्धशतक झळकावणाऱया पुजाराने येथे 77 चेंडूत 7 चौकारांसह 43 धावांचे योगदान दिले. कोहलीने खाते उघडण्यासाठी 15 चेंडू घेतले. पण, जान्सनला अप्रतिम चौकार फटकावत त्याने आपले आक्रमक इरादे लवकरच स्पष्ट केले. सातव्या-आठव्या स्टम्पच्या दिशेने असावेत, अशा चेंडूवर यापूर्वी बाद झाल्याने विराटने येथे यष्टीबाहेरील चेंडू सोडून देण्यावर भर दिला आणि ही रणनीती उत्तमरित्या फलद्रुप झाली. उपाहाराअखेर भारताची 2 बाद 75 अशी स्थिती होती.
पुजारा-विराटची अर्धशतकी भागीदारी
पुजारा व विराट यांनी तिसऱया गडय़ासाठी 62 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारल्याने संघाला दिलासा मिळाला. पुजारा तिसऱया गडय़ाच्या रुपाने बाद झाला, त्यावेळी भारताने 37.3 षटकात 3 बाद 95 पर्यंत मजल मारली होती. अजिंक्य रहाणे (9) व रिषभ पंत (27) यांचे स्वस्तात बाद होणे मात्र संघाला धक्का देणारे ठरले. रहाणेने रबाडाच्या गोलंदाजीवर यष्टीमागे व्हेरेनकडे सोपा झेल दिला तर रिषभची हाराकिरी पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य ठरली. पंतने जान्सनच्या किंचीत उसळलेल्या चेंडूवर गलीकडे फटका मारण्याच्या प्रयत्नात पीटरसनकडे सोपा झेल दिला. या प्राईज विकेटमुळे द. आफ्रिकन गोटात आनंदाची लहर उमटली नसती तरच नवल होते.
विराट शतकाच्या दिशेने आगेकूच करत असताना अश्विन (2), शार्दुल ठाकुर (12), बुमराह (0) ठरावीक अंतराने बाद होत राहिले आणि यानंतर विराटची एकाग्रताही भंगली. विराटने 9 व्या गडय़ाच्या रुपाने बाद होण्यापूर्वी 79 धावांचे योगदान दिले. त्याच्या 201 चेंडूतील या संयमी खेळीत 12 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला. पुढे एन्गिडीने शमीला (7) बाद केले आणि भारताचा पहिला डाव 77.3 षटकात सर्वबाद 223 धावांवर आटोपला.
धावफलक
भारत पहिला डाव ः केएल राहुल झे. व्हेरेन, गो. ऑलिव्हिएर 12 (35 चेंडूत 1 चौकार), मयांक अगरवाल झे. मॅरक्रम, गो. रबाडा 15 (35 चेंडूत 3 चौकार), चेतेश्वर पुजारा झे. व्हेरेन, गो. जान्सन 43 (77 चेंडूत 7 चौकार), विराट कोहली झे. व्हेरेन, गो. रबाडा 79 (201 चेंडूत 12 चौकार, 1 षटकार), अजिंक्य रहाणे झे. व्हेरेन, गो. रबाडा 9 (12 चेंडूत 2 चौकार), रिषभ पंत झे. पीटरसन, गो. जान्सन 27 (50 चेंडूत 4 चौकार), रविचंद्रन अश्विन झे. व्हेरेन, गो. जान्सन 2 (10 चेंडू), शार्दुल ठाकुर झे. पीटरसन, गो. महाराज 12 (9 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), जसप्रित बुमराह झे. एल्गार, गो. रबाडा 0 (9 चेंडू), उमेश यादव नाबाद 4 (14 चेंडू), मोहम्मद शमी झे. बवूमा, गो. एन्गिडी 7 (20 चेंडूत 1 चौकार). अवांतर 13. एकूण 77.3 षटकात सर्वबाद 223.
गडी बाद होण्याचा क्रम
1-31 (केएल राहुल, 11.2), 2-33 (मयांक, 12.2), 3-95 (पुजारा, 37.3), 4-116 (रहाणे, 42.1), 5-167 (पंत, 60.3), 6-175 (अश्विन, 62.5), 7-205 (शार्दुल, 67.4), 8-210 (बुमराह, 70.5), 9-211 (विराट, 72.3), 10-223 (शमी, 77.3).
गोलंदाजी
कॅगिसो रबाडा 22-4-73-4, डय़ुआन ऑलिव्हिएर 18-5-42-1, मार्को जान्सन 18-6-55-3, एन्गिडी 14.3-7-33-1, केशव महाराज 5-2-14-1.
दक्षिण आफ्रिका पहिला डाव ः डीन एल्गार झे. पुजारा, गो. बुमराह 3 (16 चेंडू), एडन मॅरक्रम खेळत आहे 8 (20 चेंडूत 1 चौकार), केशव महाराज खेळत आहे 6 (12 चेंडूत 1 चौकार). एकूण 8 षटकात 1 बाद 17.
गडी बाद होण्याचा क्रम
1-10 (एल्गार, 4.4).
गोलंदाजी
बुमराह 4-4-0-1, उमेश यादव 2-0-10-0, शमी 2-0-7-0.
बॉक्स
99 व्या कसोटीत लक्षवेधी योगदान देणारे भारतीय फलंदाज
फलंदाज / धावा / प्रतिस्पर्धी / ठिकाण / वर्ष
सुनील गावसकर / 236 ना. / विंडीज / चेन्नई / 1983
सचिन तेंडुलकर / 193 / इंग्लंड / लीड्स / 2002
व्हीव्हीएस लक्ष्मण / 200 ना. व 59 ना. / ऑस्ट्रेलिया / दिल्ली / 2008
राहुल द्रविड / 42 ना. व 95 / इंग्लंड / मोहाली / 2006
सौरभ गांगुली / 239 व 91 / पाकिस्तान / बेंगळूर / 2007
विरेंद्र सेहवाग / 117 / इंग्लंड / अहमदाबाद / 2012
विराट कोहली / 79 / द. आफ्रिका / केपटाऊन / 2022.