ऑनलाईन टीम / येरेआन :
अर्मेनिया आणि अझरबैजान या दोन देशात नागोर्नो-काराबाख या विभाजनवादी भूभागावरून हा संघर्ष पेटला आहे. दोन्ही देशात सध्या लढाई सुरू असून, तोफा, रणगाडे, क्षेपणास्त्र, हेलिकॉप्टर यांच्या मदतीने थेट एकमेकांवर हल्ले सुरू आहेत. या लढाईत आतापर्यंत 23 जण ठार झाले आहेत. तर 100 हून अधिक जखमी झाले आहेत.
अर्मेनिया आणि अझरबैजान हे एके काळी सोविएत रशियाचा भाग होते. दोन्ही देशांनी 4 हजार 400 चौरस किलोमीटर परिसरातील नागोर्नो-काराबाख या भूभागावर दावा केला आहे. आंतरराष्ट्रीय नकाशानुसार नागोर्नो-काराबाख अझरबैजानच्या हद्दीत आहे, मात्र या भूभागावर सध्या आर्मेनियातील स्थानिक सशस्त्र गटांचा ताबा आहे. त्या वादातून दोन्ही देशात लढाई सुरू आहे.
संयुक्त राष्ट्रांनी लढाईची भीषणता लक्षात घेत दोन्ही देशांना शांततेचे आवाहन केले आहे. तसेच लढाई सुरू असलेल्या ठिकाणी तातडीने मानवतेच्या दृष्टीकोनातून आवश्यक ती सर्व मदत (अन्नधान्य, पाणी आणि औषधे) देणार असल्याचे जाहीर केले. रशियाने दोन्ही देशांना ताबडतोब लढाई थांबवून चर्चेद्वारे मतभेद दूर करण्याचे आवाहन केले आहे.