वृत्तसंस्था/ लंडन
येथील वेम्ब्ली स्टेडियमवर शनिवारी झालेल्या एफ ए चषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात अर्सेनलने चेल्सीचा 2-1 अशा गोल फरकाने पराभव करून अंजिक्यपद पटकाविले. अर्सेनलने विक्रमी 14 व्यांदा एफए चषकावर आपले नाव कोरले. या सामन्यात अर्सेनल संघातील पिएरी इमरिक ओबामेयांगने दोन गोल नोंदविले.
हा अंतिम सामना बंदीस्त स्टेडियममध्ये प्रेक्षकविना खेळविला गेला. या अंतिम सामन्यात सिझर ऍझपिलीक्युटाने आक्रमक आणि वेगवान चाल करत चेल्सीला खाते उघडून दिले. सिझरने हा गोल पेनल्टीवर नोंदवून चेल्सीला 1-0 अशी आघाडी म्ळिवून दिली. मध्यंतराला 23 मिनिटे बाकी असताना पिएरी इमरिकने अर्सेनलला बरोबरी साधून दिली. दरम्यान चेल्सी संघातील कोव्हॅसिकला पंचांनी दुसऱयांदा पिवळे कार्ड दाखवून मैदानावर बाहेर काढल्याने चेल्सी संघाला या सामन्यातील उर्वरित कालावधीत दहा खेळाडूंनिशी खेळावे लागले. सामन्याच्या उत्तरार्धात पिएरी इमरिकने अर्सेनलचा आणि वैयक्तिक दुसरा निर्णायक गोल नोंदवून चेल्सीचे आव्हान संपुष्टात आणले. चालू वर्षीच्या फुटबॉल हंगामात आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू पिएरी इमरिकने विविध स्पर्धामध्ये 29 गोल नोंदविले आहेत. पुढीलवर्षीच्या युरोपियन फुटबॉल हंगामासाठी अर्सेनलने 1995-96 नंतर पहिल्यांदाच युरोपा लीग फुटबॉल स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली. या स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणाऱया चेल्सी संघाने आगामी फुटबॉल हंगामातील चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.