वृत्तसंस्था / लंडन
शनिवारी झालेल्या एमिरेट्स स्टेडियममधील मित्रत्वाच्या फुटबॉल सामन्यात अर्सेनल फुटबॉल क्लबने चार्लटन ऍथलेटिकचा 6-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. सदर सामना बंदिस्त स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना खेळविला गेला.
या सामन्यामुळे आता इंग्लीश प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यांना पुन्हा प्रारंभ करण्याचे संकेत मिळाले आहेत. प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धा तब्बल तीन महिन्यांनंतर 17 जूनपासून पुन्हा खेळविली जाणार आहे. शनिवारच्या सामन्यात अर्सेनल क्लबतर्फे ऍलेक्स लेकाझेटी, पियेरी, इमेरिक यांनी पूर्वार्धात प्रत्येकी एक गोल केला. तर इडे निकेटीने खेळाच्या उत्तरार्धात हॅटट्रिक नोंदविली. त्याचप्रमाणे विलॉकने अर्सेनलचा सहावा गोल केला. प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या गुणतक्त्यात अर्सेनल नवव्या स्थानावर असून त्यांचा मँचेस्टर सिटीबरोबरचा सामना 17 जूनला होणार आहे.