वैभववाडी-सांगुळवाडीतील घटनाः मुलगा मूळ भंडारा जिल्हय़ातील : गोव्याला जाताना पोलिसांनी घेतले होते ताब्यात
प्रतिनिधी / वैभववाडी
वैभववाडी-सांगुळवाडी येथे संस्था अलगीकरण कक्षात असलेल्या मूळ भंडारा जिल्हय़ातील 17 वर्षीय मुलाने पलायन केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस या मुलाचा शोध घेत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या अनुषंगाने जिल्हय़ात येणाऱया व जिल्हय़ाबाहेर जाणाऱया वाहनांची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. दरम्यान, भंडारा येथून ओळखीच्या व्यक्तीच्या ट्रकमधून एक मुलगा गोव्याला जात होता. गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास करूळ चेकनाका येथे महिला पोलीस उपनिरीक्षक जी. जी. पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास राठोड, पोलीस कॉन्स्टेबल चिले हे तपासणी करत असताना ही बाब लक्षात आली. या मुलाची चौकशी केल्यानंतर तो ट्रकमधून गोवा फिरण्यासाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस कर्मचाऱयांनी त्या मुलाला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्याला कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने त्याला सांगुळवाडी येथे संस्था अलगीकरण कक्षात ठेवले होते.
पोलिसांनी जंगल परिसर पिंजून काढला
दरम्यान, गुरुवारपासून हा मुलगा कक्षात रडत होता. घर आणि नातेवाईक दूर असल्याने तो दिवसभर चलबिचल अवस्थेत होता. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वा. च्या सुमारास त्याने संस्था अलगीकरण कक्षातून पलायन केले. याची माहिती मिळताच वैभववाडी पोलिसांनी अलगीकरण कक्षाकडे धाव घेतली. पोलिसांचे एक पथक या मुलाचा शोध घेत आहे. सांगुळवाडी येथील संस्था अलगीकरण कक्षाच्या आजूबाजूला घनदाट जंगल आहे. सायंकाळी पोलिसांनी हा जंगलमय परिसर पिंजून काढला. मात्र, या मुलाचा सापडला नाही. या मुलाच्या पलायनाने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.