दिव्यांग मुलीवर सामूहिक बलात्कार : भाजपकडून पत्रकार परिषदेत आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राजस्थानच्या अलवरमध्ये दिव्यांग मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराला चार दिवस उलटून देखील पोलिसांच्या तपासाला अद्याप वेग आलेला नाही. तर याप्रकरणी भाजपने काँग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला आहे. या क्रूर गुन्हय़ांनंर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका वड्रा यांनी बाळगलेल्या मौनावर भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
राहुल गांधी हे उत्तरप्रदेशच्या राजकीय मैदानातून गायब आहेत. राहुल गांधी हे अपयशी ठरल्यानेच उत्तरप्रदेशात प्रियंका वड्रा यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. एका 15-16 वर्षीय दिव्यांग मुलीवर राजस्थानच्या अलवरमध्ये सामूहिक बलात्कार झाला. रक्ताच्या थारोळय़ात या मुलीला रस्त्यावर टाकून एक गाडी निघून गेली. आज ही मुलगी अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देतेय. अलवरमध्ये हा गुन्हा घडत असताना प्रियंका वड्रा रणथंबोरमध्ये स्वतःचा जन्मदिवस साजरा करत होत्या अशी टीका भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे.
अलवरमध्ये मंगळवारी एका मूकबधिर अल्पवयीन मुलीवर दिल्लीच्या ‘निर्भया’प्रमाणेच सामूहिक बलात्कार करण्यात आला. सामूहिक बलात्कारानंतर तिला उड्डाणपूलावरून खाली फेकण्यात आले. अलवर येथील या घटनेनंतर राज्यात वाढत चाललेल्या महिलाविरोधी गुन्हय़ांमध्ये अशोक गेहलोत सरकारला आरोपीच्या पिंजऱयात उभे केले जात आहे. भाजप नेत्या वसुंधरा राजे यांनी राज्यात मुलींना क्रौर्याला सामोरे जावे लागत असताना राज्य सरकार शून्य ठरल्याची टीका केली आहे.