प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अलायन्स एअर या विमान कंपनीने बंद केलेल्या बेंगळूर-बेळगाव व पुणे-बेळगाव या दोन सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. येत्या 27 ऑगस्टपासून या दोन्ही शहरांच्या विमानसेवा पूर्ववत केल्या जाणार आहेत, अशी माहिती बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी दिली.
कोरोनाचा प्रसार वाढताच देशांतर्गत सुरू असलेली विमानसेवा 25 मार्चपासून बंद करण्यात आली. त्यामुळे एअर इंडियाच्या अलायन्स एअरने बेळगावमधून देण्यात येणाऱया पुणे व बेंगळूर या सेवा बंद केल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांनी केंद्रीय विमान प्राधिकरणाने मान्यता दिल्यानंतर काही दिवस पुणे सेवा सुरू करण्यात आली होती. परंतु ही सेवादेखील मागील काही दिवसांपासून बंद होती. त्यामुळे या दोन्ही सेवा पूर्ववत करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात होती.
बेंगळूरमधून दुपारी 2.15 वा. उड्डाण घेतलेले विमान 3.40 वा. बेळगावला पोहोचणार आहे. तर 4.05 वा. बेळगावमधून उड्डाण घेतलेले विमान 5.20 वा. पुण्याला पोहोचणार आहे. 5.45 वा. पुणे येथून उड्डाण घेऊन सायंकाळी 7 वा. बेळगावला पोहोचेल. बेळगावमधून 7.30 वा. उड्डाण घेतलेले विमान 10.55 वा. बेंगळूरला पोहोचणार आहे.