तांत्रिक कारणामुळे स्थगित केल्याची माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
तांत्रिक कारणामुळे बेळगाव-पुणे ही अलायन्स एअरची विमानसेवा बंद ठेवण्यात आली आहे. ही सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली असून लवकरच ती पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या मार्गावर प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद असल्यामुळे विमानसेवा पूर्ववत करण्याची मागणी करण्यात येत आहे.
अलायन्स एअर पुणे-बेळगाव-बेंगळूर व बेंगळूर-बेळगाव-पुणे अशी विमानसेवा देते. बेळगाव-पुणे हा मार्ग उडान 3 अंतर्गत अलायन्सला मंजूर झाला होता. मागील 2 वर्षांपासून ही विमानफेरी सुरू आहे. पुणे येथे अनेक कार्पोरेट कार्यालये असल्याने प्रवाशांची दररोज ये-जात असते. बेळगाव व पुण्यामध्ये प्रवास करणाऱयांची संख्या अधिक असल्याने या फेरीला चांगला प्रतिसाद मिळत होता.
परंतु मागील 8 दिवसांपासून ही विमानफेरी बंद आहे. तांत्रिक कारणाने ही फेरी बंद करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पहिल्यांदा काही दिवसांसाठी बंद असणार असल्याची माहिती देण्यात आली होती. परंतु अद्याप ही फेरी केव्हा सुरू होईल याविषयी माहिती देण्यात आली नाही. तसेच ही फेरी बंद झाल्याने बेळगाव-बेंगळूर मार्गावरील एक विमान कमी झाले आहे. त्यामुळे ही सेवा पूर्ववत करण्याची मागणी करण्यात येत आहे.
फेरी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न – राजेशकुमार मौर्य (संचालक-बेळगाव विमानतळ)
अलायन्स कंपनीने तांत्रिक कारणाने काही दिवसांसाठी पुणे-बेळगाव-बेंगळूर ही फेरी रद्द केली आहे. परंतु ही फेरी लवकरच पुन्हा सुरुवात करण्यात येणार आहे. बेळगाव-पुणे हा मार्ग उडान अंतर्गत मंजूर असल्याने फेरी लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.