विद्यार्थ्यांनी वाहने पेटवली, कारचेही नुकसान
प्रयागराज / वृत्तसंस्था
प्रयागराज येथील अलाहाबाद विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये सोमवारी शुल्क (फी) वाढीवरून हिंसाचार झाला. विद्यार्थी आंदोलकांनी दोन दुचाकी जाळल्या आणि एका कारचेही नुकसान केले. आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी झालेल्या संघर्षात अनेक विद्यार्थी आणि पोलीस जखमी झाले आहेत. या हिंसाचारामुळे मंगळवार, 20 डिसेंबर 2022 रोजी सर्व कामकाज बंद ठेवण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे.
विद्यापीठातील फी वाढीवरून काही विद्यार्थी गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. त्यातूनच सोमवारी हिंसाचाराची घटना घडली. परिस्थिती आता नियंत्रणात असून प्रयागराजचे पोलीसप्रमुख आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित असल्याचे उत्तर प्रदेशचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचा सुरुवातीला सुरक्षा रक्षकांशी आणि नंतर पोलिसांशी जोरदार संघर्ष झाला. विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी एका विद्यार्थी नेत्याला कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यापासून रोखल्यानंतर हिंसाचाराचा भडका उडाला. या प्रकाराबाबत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरा सुरू झाली होती. चौकशी आणि कारवाईसाठी व्हिडिओ फुटेज तपासले जात आहे. या घटनेत दोन मोटारसायकली जाळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच एका कारच्या दर्शनी भागाची तोडफोड करण्यात आली आहे. दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.