वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
चीनमध्ये दिग्गज ई कॉमर्स क्षेत्रात कार्यरत असणारा अलिबाबा समूह आता भारत आणि चीन यांच्यातील वाढत्या तणावाच्या कारणामुळे काही काळासाठी भारतामध्ये गुंतवणूक करणार नसल्याची माहिती आहे.
भारतामधील चिनी गुंतवणुकीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याच्या कारणामुळेही आगामी 6 महिन्यांसाठी अलिबाबा समूह कोणतेही नवीन व्यवहार करणार नसल्याची माहिती रॉयटर्सने दिली आहे. परंतु यावर अलिबाबाकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रीया मिळालेली नाही. चालू वर्षातील सरुवातीच्या महिन्यांमध्ये अलिबाबाची सहयोगी कंपनी ऍट फायनान्शिअलने झोमॅटोमध्ये 1,050 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. यानंतर ऑनलाईन फूड डिलीवरी आणि रेस्टराँ अग्रीगेटर प्लॅटफॉर्म झोमॅटोचे मूल्य 2,100 कोटी रुपयांच्या घरात पोहोचल्याची नोंद आहे.
जपानची सॉफ्टबँक आणि ब्रिटनची स्टेव्हव्हीव कॅपिटल यांनी अब्ज डॉलरपेक्षा अधिक मूल्यांकन असणाऱया सात कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. भारताच्या टॉप युनिकॉर्न कंपन्यांमधील प्रमुख रुपाने गुंतवणूक करणारी एकमेव चिनी कंपनी म्हणून टेंसेन्ट होल्डींग्स राहीली आहे.
भारतीय स्टार्टअप्सना झटका
जॅक मा यांची कंपनी अलिबाबा समूहाने जर सदर निर्णयांची गंभीरपणे दखल घेतली तर देशातील विविध स्टार्टअप्सना मोठा झटका बसण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. यासोबत ज्या कंपन्या अलिबाबामध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत, त्यांनाही हा धक्का बसण्याचा अंदाज आहे. यामध्ये प्रामुख्याने पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएम, रेस्टराँ ऍग्रीगेटर आणि फूड डिलीवरी सर्व्हिस झोमॅटोसह ई ग्रॉसर बिग बास्केट आदींचा समावेश आहे.