क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
साईराज क्रिकेट फौंडेशन आयोजित सातव्या साईराज चषक निमंत्रितांच्या आंतरराज्य टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात अलोन मुंबई, डिंगडॉंग, चॅलेंजर्स बॉईज मुंबई संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून पुढील फेरीत प्रवेश केला. योगेश गावडे, अजय सराज, राहुल पाटील, कृष्णा सातपुते, सिद्दगी यांना सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
व्हॅक्सिन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात मोईन बॉईज संघाने 8 षटकात 8 बाद 53 धावा केल्या. त्यात समीर मलिकने 13 धावा केल्या. मैत्रियी स्पोर्ट्सतर्फे योगेशने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल मैत्रियी स्पोर्ट्सने 5.2 षटकात 1 बाद 54 धावा करून सामना 9 गडय़ांनी जिंकला. योगेश गावडेने 30 धावा केल्या. दुसऱया सामन्यात ग्रामीण वॉरियर्स संघाने 8 षटकात 5 बाद 46 धावा केल्या. अलोन मुंबईतर्फे अजय सराजने 9 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल अलोन स्पोर्ट्सने 4 षटकात 2 बाद 48 धावा करून सामना 8 गडय़ानी जिंकला. कृष्णा सातपुतेने 37 धावा केल्या. तिसऱया सामन्यात डिंगडॉंग संघाने 8 षटकात 9 बाद 84 धावा केल्या. त्यात राहुलने 16 धावा केल्या. राजमुद्रा संघातर्फे शेखरने 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल राजमुद्रा संघाने 8 षटकात 7 बाद 50 धावाच केल्या. त्यात विकीने 19 धावा केल्या. चौथ्या सामन्यात अलोक मुंबईने 8 षटकात 3 बाद 127 धावा केल्या. त्यात कृष्णा सातपुतेने 4 षटकार, 4 चौकारासह 21 चेंडूत 52 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मैत्रियी स्पोर्ट्स मजगावने 8 षटकात 6 गडी बाद 47 धावा केल्या. कृष्णा सातपुतेने 5 धावात 2 गडी बाद केले. हा सामना अलोन मुंबईने 82 धावानी जिंकला. पाचव्या सामन्यात चॅलेंजर बॉईज मुंबई संघाने 8 षटकात 9 बाद 79 धावा केल्या. त्यात खतालने 28 धावा केल्या. बालाजीतर्फे दीपकने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल बालाजीने 8 षटकात 6 बाद 54 धावाच केल्या. विष्णूने 19 धावा केल्या. मुंबईतर्फे सिद्धूने 3 गडी बाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे ब्रम्हानंद मिरजकर, महेश फगरे, राजेश जाधव, रमेश गोधवानी, चंदर कुंदरनाड, प्रवीण कुऱहाडे, अमर नाईक आदी मान्यवरांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देण्यात आले.
आंतरराष्ट्रीय टेनिसबॉल क्रिकेटपटू कृष्णा सातपुतेचा गौरव
कृष्णा सातपुते हा महाराष्ट्रातील सोलापूरचा क्रिकेटपटू. 2019 साली इंग्लंड येथे टेनिसबॉल बॉक्स विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करताना या स्पर्धेचे अजिंक्मयपद पटकाविले होते. त्याच्यासोबत अनिल जाधव, भरत लोहार, ओंकार देसाई हे महाराष्ट्राचे खेळाडूही भारतीय संघात होते. त्याशिवाय कृष्णाने कतार, दुबई येथे टीपीएल, भारतात यूपी, भोपाल, दिल्ली, मध्यप्रदेश कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रात अनेक जिल्हय़ात खेळून एक वेगळे स्थान मिळविले आहे. दोन वर्षापूर्वी अनिल बेनके चषक क्रिकेट स्पर्धेत खेळताना त्याने मालिकावीर पुरस्कार पटकाविला होता. त्याचप्रमाणे सध्या त्याने महाराष्ट्र, भोपाळ व युपी येथील स्पर्धांत 3 सलग मालिकावीर पुरस्कारासह तीन चारचाकी वाहनांचे बक्षीस पटकाविले आहे. तो बेळगावच्या साईराज चषक क्रिकेट स्पर्धेत अलोन मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे.
बुधवारचे सामने
1) एसआरएस हिंदुस्थान वि. एम. डी. स्पोर्ट्स, सकाळी 9 वा.,
2) युपी बॉईज वि. डीजे बॉईज, सकाळी 11 वा.,
3) डिंगडाँग वि. वॉरियर्स, दुपारी 1 वा., 4) चॅलेंजर बॉईज वि. पहिल्या सामन्यातील विजेता संघ, दु. 3 वा.