वृत्तसंस्था/ अल्जियर्स
अल्जेरियाचा फुटबॉलपटू सोफियान लोउकर याचे गोलरक्षकाशी धडक झाल्यानंतर हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ओरान येथे शनिवारी द्वितीय विभागीय सामन्यावेळी ही दुर्दैवी घटना घडल्याचे स्थानिक मीडियाने वृत्त दिले आहे.
मुलोदिया सायदाचा 28 वर्षीय सोफियान पूर्वार्धात आपल्या गोलरक्षकाकडे धावत गेला, त्यावेळी धडक बसल्याने तो जखमी झाला. प्राथमिक उपचारानंतर त्याने पुन्हा खेळायला सुरुवात केली. पण दहा मिनिटानंतर तो मैदानातच कोसळला. त्याला ताबडतोब हॉस्पिटलला नेण्यात आले. पण वाटेतच त्याचे हृदयविकाराने निधन झाले. त्याच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर सामना रद्द करण्यात आला.