दि. 25 च्या रात्रीपासून ते दि. 26 च्या सकाळपर्यंत धावून केला प्रजासत्ताक दिन साजरा
प्रतिनिधी/ सातारा
72 वा प्रजासत्ताक दिन हा साताऱयातील धावपट्टूंनी 72 किलोमीटर धावून साजरा करण्याचा संकल्प केला होता. तर काही मंडळींनी 72 किलोमीटर सायकलींग करुन धावण्याचा संकल्प केला होता. या इंडिया प्राईड अल्ट्रा रन राईडमध्ये सातारकरांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवत 72 किलोमीटरचे अंतर पार केले. दि. 25 रोजी सायंकाळी फ्लॅग दाखवून या राईडला प्रारंभ झाला होता. ते दि. 26 रोजी ही राईड पूर्ण झाली. 20 जणांनी सायकलींग करत 72 किलोमीटर अंतर पार केले. सहभागी झालेल्यांचा गौरव प्रमाणपत्र देवून डॉ. संदीप काटे यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एक साताऱयाची नवी ओळख म्हणून गेल्या वर्षीपासून धावून साजरा करण्याची सुरुवात केली आहे. यावर्षी 72 वा प्रजासत्ताक दिन असल्याने 72 किलोमीटरची अल्ट्रा प्राईड रन राईड करण्याचा संकल्प हाती घेतला अन् त्या रनचा शुभारंभ डॉ. संदीप काटे, डॉ. प्रताप गोळे, डॉ. अनिल पाटील, अभियंता प्रशांत खैरमोडे यांच्या हस्ते ध्वज दाखवून प्रारंभ करण्यात आला. या 72 किलोमीटरच्या प्राईड रनमध्ये 18 जण धावले. त्यामध्ये नवनाथ डिगे, सुभाष भोसले, सुधीर पवार, शैलेश शिंदे, डॉ. नितीन कोळगे, तानाजी वगरे, विठ्ठल बलशेठवार आदींनी तब्बल सलग दहा तास पळून 72 किलोमीटर अंतर पूर्ण केले.
साडेचार तासात 72 किलोमीटर सायकलिंग
तसेच पहाटे 4 वाजता 72 किलोमीटर सायकलींगींसाठी पंकज नागोरी, गणेश पंडित, सुहास पाटील, तुषार लोया, महेश मोरे, हेमल उपाध्याय आदी 20 जणांनी साडे चार तासात अंतर पूर्ण करुन समारोप करण्यात आला. या रनचा शुभारंभ पोवई नाका येथून झाला होता. राजवाडा मंगळवार तळे पुन्हा पोवई नाका असे 14 राऊंड धावपट्टूंनी मारले. सकाळी आठ वाजता सहभागी झालेल्यांचा सन्मानिन्ह प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.