अल्पवयीन आरोपीला शिक्षा ठोठावणारा देशातील पहिलाच ऐतिहासिक निकाल
- अल्पवयीन मुलीवर लैंगिक
अत्याचार करून केला होता खून
- सांगली जिल्हा विशेष न्यायालयाने
एक वर्षात दिला निकाल
- निकाल देणारे न्यायाधीश
डी. बी. सातवळेकर, सिंधुदुर्गचे सुपुत्र
प्रतिनिधी
ओरोस
सांगली जिल्हय़ातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला सांगली जिल्हा विशेष न्यायालयाने तब्बल 12 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावत भारतीय न्याय व्यवस्थेत एक ऐतिहासिक निकाल दिला आहे.
अल्पवयीन गुन्हेगाराला शिक्षा सुनावण्याची ही देशभरातील पहिलीच घटना आहे. योग्य साक्षी-पुरावे न्यायालयासमोर आल्यास अल्पवयीन गुन्हेगारालाही शिक्षा होऊ शकते, हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पदावर सांगली येथे काम करीत असलेले आणि या प्रकरणाचा निकाल देणारे न्यायाधीश डी. बी. सातवळेकर हे देवगड तालुक्यातील मणचे येथील म्हणजेच सिंधुदुर्गचे सुपुत्र आहेत.
20 मे 2020 रोजी सायंकाळी संबंधित अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. सगळीकडे शोधाशोध करूनही ती सापडली नव्हती. अखेर दुसऱया दिवशी तिचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहावर अनेक जखमा दिसून येत होत्या. या प्रकरणी मयत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली होती. पोलीस तपासात अल्पवयीन आरोपीने तिला अश्लील चित्रफित दाखवून तिच्यावर अनैसर्गिक बलात्कार केला व त्यानंतर तिचा खून केल्याचे उघड झाले होते.
सांगली जिल्हा विशेष न्यायालयात चाललेल्या या खटल्याच्या सुनावणीत पोलिसांकडून झालेला योग्य तपास, वैद्यकीय अहवाल, डीएनए अहवाल तसेच साक्षीदारांचे जबाब यावरून संशयित आरोपीबाबतचे भक्कम पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. घटना घडल्यापासून एक वर्षाच्या आत या खटल्याचा निकाल देण्यात आला.
अतिशय क्रूर कृत्य करणाऱया नराधमाला न्यायालयाने दोषी धरून भारतीय दंड विधान 302, 363, 376 (अ), 376 (अ), (ब), 377 (अ) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 आणि 6 नुसार शिक्षा ठोठावली आहे.
भारतीय न्याय प्रक्रियेतील महत्वाचा निर्णय – ऍड. अजित भणगे
15ओरोस 8 ऍड. अजित भणगे) जुवेनाईल जस्टीस आणि पोक्सो ऍक्ट यांची सांगड घालून दिला गेलेला निर्णय हा भारतीय न्याय प्रक्रियेतील महत्वाचा निर्णय आहे. विधी संघर्षग्रस्त बालक या संज्ञेखाली येत असल्याने कोणताही गुन्हा केला, तरी आपल्याला शिक्षा होणार नाही, असा भ्रम असलेल्या अल्पवयीनांसाठी हा लगाम आहे. समाजातील अशा विकृत गुन्हेगारीला निश्चितच आळा बसेल, असे मत सिंधुदुर्ग जिल्हय़ातील ज्येष्ठ विधीज्ञ अजित भणगे यांनी तरुण भारतशी बोलताना व्यक्त केले आहे. तसेच समाजविघातक प्रवृत्तीला आळा घालणाऱया या निकालाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.