प्रतिनिधी / कोल्हापूर
अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी कोनोली पैकी कुपलेवाडी (ता. राधानगरी) येथील मारुती बाळकू कुपले (वय 27) या तरुणाला याला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी कोर्ट उठेपर्यत एक दिवसाची शिक्षा व दहा हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास सहा महिन्याची साधी कैद अशी गुरुवारी (9 जानेवारी) शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकारी वकील म्हणून ऍड. अमृता पाटोळे यांनी काम पाहिले.
या खटल्या पार्श्वभूमी अशी, पिडीत अल्पवयीन मुलगी ही शिक्षणाकरीता आतीकडे रहाण्यास आली होती. यावेळी आरोपी मारुती कुपले याने पिडीता 2 मार्च 2017 रोजी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास पायी जात होती. त्यावेळी त्याने तिच्या पाठीमागून दुचाकी घेवून येवून तिच्याजवळ थांबविली. माझे तुझ्याकडे काम आहे. जरा थांब असे म्हणून त्याने पिडीतेचा हात पिरंगळून तुझा काय आहे ते सांग. नाहीतर तुझ्या आई – वडीलाना मारुन टाकीन अशी धमकी देवून, तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते.
याप्रकरणी कुपले विरोधी राधानगरी पोलिसात बालकांचे लैगिंक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली होती. या गुह्याचा राधानगरी पोलीस ठार्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एम. आर. पाटील यांनी तपास करुन, त्याचे दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात पाठविले होते. या खटल्याची जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. पाटील यांच्या समोर सुनावणी सुरु होती. सुनावणी दरम्यान सरकारी वकील अमृता पाटोळे यांनी एकूण पाच साक्षीदार तपासले. तसेच केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी मारुती कुपलेला कोर्ट उठेपर्यत एक दिवसाची शिक्षा व दहा हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास सहा महिन्याची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.