प्रतिनिधी / इस्लामपूर
इस्लामपूर येथील अल्पवयीन अल्पवयीन मुलीची छेडछाड प्रकरणी अमित विलास कदम(२५,रा.इस्लामपूर) याला पहिले अतिरिक्त जिल्हा सत्रन्यायाधिश एस.सी.मुनघाटे यांनी एक वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या खटल्यात मुलीचे वडील फितूर झाले. मुलगी मात्र ठाम राहिली.
ही १५ वर्षीय मुलगी एका शाळेत इयत्ता ८ वीत शिकत होती. दरम्यान कदम हा दि. ३ एप्रिल २०१८ पुर्वी दोन वर्षे या मुलीस त्रास देत होता. मोटारसायकलवरुन छेडछाड करत जीवे मारण्याची धमकी देत होता. दरम्यान त्याचा एक अल्पवयीन मित्र ही त्याला साथ देत होता.
याप्रकरणी कदम याच्या विरुध्द भा.द.वि.स.कलम ३५४(ड), ३४१, ५०६, ३४ व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम १२ नुसार फिर्याद दाखल करण्यात आली होती. न्यायाधिश मुनघाटे यांच्यासमोर सुनावणी झाली.
यामध्ये सहाय्यक सरकारी वकील रणजित एस.पाटील यांनी काम पाहिले. या खटल्यात चार साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी पिडीत मुलगी, तपासी अंमलदार, पोलीस उपनिरीक्षक कोमल पोवार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.