प्रतिनिधी / नागठाणे
बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या संशयित युवकास बोरगाव पोलिसांनी कर्नाटक राज्यातून अटक केली.अमोघसिद्ध महादेव कुंभार (वय.२२,रा.अहेरसंग,ता.इंडी,जि. विजापूर-कर्नाटक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.शनिवारी त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलगी ही लहानपणापासून तिच्या आजोळी राहत होती.सोमवारी सकाळी मुलीला घरी यावयाचे असल्याने तिला आजोळहून भावाने एसटी बस मध्ये बसवुन दिले.मुलीला बसमध्ये बसवून दिल्याची माहिती त्याने फोनवर दिली.मात्र सायंकाळ झाली तरी मुलगी घरी न आल्याने नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला.ती सापडून न आल्याने मंगळवारी रात्री कुटुंबीयांनी बोरगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेण्याचा गुन्हा दाखल केला होता.
पोलीस तपास करत असतानाच सदर अल्पवयीन मुलगी अचानक घरी परतली. कुटुंबीयांनी मुलीस बोरगाव पोलिस ठाण्यास आणले.यावेळी तिच्याकडे अधिक चौकशी केली असता मुलीस अमोघसिद्ध कुंभार याने इंडी (कर्नाटक) येथे बोलावून घेउन तेथील एका लॉजवर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांनी संशयितावर भा.दं.विं. स.कलम ३६३ बरोबरच ३७६,लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६ प्रमाणे गुन्हा दाखल केला.घटनेचे गांभीर्य ओळखत सपोनि डॉ.सागर वाघ हे हवालदार मनोहर सुर्वे,किरण निकम,राहुल भोये व विशाल जाधव यांच्यासह इंडी (कर्नाटक) येथे शुक्रवारी सकाळी रवाना झाले.
तेथे कर्नाटक पोलीस व सायबर सेलच्या मदतीने कर्नाटकातील नाद गावच्या शिवारात लपलेल्या संशयित अमोघसिद्ध कुंभार याला ताब्यात घेत अटक केली.शनिवारी पहाटे त्याला बोरगाव येथे आणून जिल्हा न्यायालयासमोर हजर केले.न्यायालयाने त्याला पाच दिवसांचा पोलीस कोठडी सुनावली.पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल,अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील,सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल,सपोनि डॉ.सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.